अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शेवगाव-पाथर्डी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खून, दरोड्यासह जबरी चोरी, घरफोड्या करणार्या दहाजणांच्या स्थानिक सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेने शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील दहा आरोपींना ताब्यात घेतले असून या टोळीने खून, दरोडा, जबरी चोरीसह घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या आठवड्यात तिसगाव शिवारात राहणार्या मच्छिंद्र ससाणे या वृध्दाचा शेळ्या व कोंबड्या चोरताना डोक्यात धारदार शस्त्र मारून खून केला होता. या खुनासह जबरी चोरीचा तपास पाथर्डी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला.
यात ससाणे यांचा खून झालेल्या ठिकाणी साक्षीदाराकडे विचारपूस केल्यानंतर आरोपी हे मोटार सायकलवरून आल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या तपास पथकाने घटना घडलेल्या ठिकाणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून, तिसगावपासून नगर, मिरी, शेवगाव व पाथर्डी रोडच्याच सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच घटना घडलेल्या वेळेपासून तांत्रिक विश्लेषण करून 3 मोटार सायकलवरून 10 आरोपी पाथर्डी रोडने तिसगावकडे गेल्याचे तपासात समोर आले. सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित इसमांचे फोटो बातमीदारांना पाठवून गुन्हा करणार्या आरोपींची ओळख पटविण्यात आली.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे वाकळे वस्ती, माळीबाभुळगाव परिसरातील असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पथक तयार करून आरोपींच्या शोधार्थ पाठवण्यात आले. वाकळे वस्ती याठिकाणी पोलीस गेले असता त्यांना एका पालाजवळ 8 ते 10 इसम बसलेले दिसले. पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना संशयित इसम पोलीस पथकास पाहून पळून जाऊ लागले. पथकाने त्यापैकी 6 इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. यात उमेश रोशन भोसले (वय 26, रा. साकेगाव), दौलत शुकनाश्या काळे (वय 25, रा. माळीबाभुळगाव), सिसम वैभव काळे, (रा.माळीबाभुळगाव), शिवाजी रोशन उर्फ शेरू भोसले, (रा. साकेगाव), आकाश उर्फ फय्याज शेरू उर्फ लोल्या काळे, (रा.बाभुळगाव), विधी संघर्षित बालक (वय 14) असे सांगितले. त्यांच्याकडे तिसगावच्या गुन्ह्याबाबत विचारणा केली असता, हा गुन्हा सेशन उर्फ बल्लु रायभान भोसले (रा. साकेगाव), बेर्या रायभान भोसले (रा.साकेगाव), आज्या उर्फ बेडरुल सुरेश भोसले (रा. टाकळीफाटा), लोल्या उर्फ शेरू सुकनाश्या काळे, (रा. माळी बाभुळगाव) यांच्यासह केल्याची गुन्हा केल्याचे सांगितले.
तिसगावच्या घटनेत आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी मोटार सायकलवर जात एकांतातली वस्ती पाहून व शेजारील घरांना कड्या लावून, ज्या घरात वयस्कर लोक झोपलेले असतील प्रथम त्यांना मारहाण करून त्यांच्या जवळील दागिने हिसकावून घेतल्याची माहिती दिली. तसेच घटनेच्यावेळी मोबाईल बंद केेलेले असल्याने तपासात अडचणी येत होत्या. अशाप्रकारे त्यांनी शेतामधील असणार्या वस्तीच्या घराचा दरवाजा तोडून, रस्ता आडवून शेवगाव तालुक्यातील बोधेगाव, घोटण, शेकटे याठिकाणी, पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, चांदगाव, जांभळी, शेकटे, दुलेचांदगाव, महिंदा, तिसगाव, सुसरे याठिकाणी तसेच मिरजगाव, ता. कर्जत व मातोरी (ता. शिरुर कासार) येथे गुन्हे केल्याचे कबूल केले. या आरोपींनी आतापर्यंत 15 गुन्हे केल्याचे उघडकीस आलेले आहेत. यात पाथर्डी तालुक्यातील दहा, शेवगाव तालुक्यातील 3 आणि मिरजगाव (ता. कर्जत), तसेच बीड जिल्ह्यातील एका अशा 15 गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने या चोरीचा तपास लावला.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी नामदेव उमेश रोशन भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुध्द खून, दरोडा, जबरी चोरीचे असे गंभीर स्वरुपाचे 6 गुन्हे, सिसम वैभव काळे याच्यावर दरोड्याचे 3 गुन्हे, दौलत शुकनाश्या काळे यांच्यावर घरफोडीचे 3 गुन्हे, लोल्या उर्फ शेरू सुकनाश्या काळे याच्यावर दरोड्याचे 4 गुन्हे व बेर्या उर्फ किशोर रायभान भोसलेव दरोडा व जबरी चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत.