शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
वीज चोरीस आळा बसावा, त्याचबरोबर कंत्राटी कामकाजामध्ये बचत व्हावी, यासाठी शासनाकडून राबविण्यात येणार्या स्मार्ट मीटर योजनेच्या पहिल्या सत्राच्या अंमलबजावणीस शहरासह तालुक्याच्या ग्रामीण परिसरात महावितरणकडून सुरुवात करण्यात आली आहे. तालुक्यातील शासकीय कार्यालय, शाळा त्याचबरोबर सदोष मीटर असलेल्या ठिकाणी महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे. शेवगाव शहरासह तालुक्यातील चापडगाव, राक्षी येथे जवळपास 350 स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून सांगण्यात आली. विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून होणार्या वीज चोरीस आळा घालण्यासाठी देखभाल दुरुस्ती मीटरची अदला बदल व त्या अनुषंगिक कामांचा वाढता भार पेलण्यासाठी कंत्राटी कामावर महावितरणला अवलंबून राहावे लागत होते.
यावर प्रभावी उपाय असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला शहर व तालुक्याच्या ग्रामीण परिसरात ठेकेदारामार्फत सुरुवात करण्यात आली असून शहरासह तालुक्याच्या ग्रामीण परिसरात आतापर्यंत जवळपास 350 स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. शासकीय कार्यालय, शाळा याठिकाणी प्राधान्याने स्मार्ट मिटर बसविण्यात येणार आहेत. खाजगी ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या या कामाबाबत नागरिकांमधून अडथळे आणले जात आहेत. त्यामुळे महावितरणच्या कर्मचार्यांमार्फत येत्या जूनपर्यंत सर्व ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्याचे नियोजन असून मानवी हस्तक्षेप विरहित असलेल्या या मीटरमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित ग्राहकाला 3 ते 12 हजारांपर्यंत दंड होऊ शकतो.
सध्या महावितरणकडून हे मीटर मोफत बसविण्यात येत असले तरी त्याची रक्कम नंतर ग्राहकांच्या बिलामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. बसविले जाणारे स्मार्ट मीटर हेच आगामी काळात प्रीपेड पद्धतीने वीज पुरवठा करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना वापराच्या प्रमाणात अधिकच्या किंवा चुकीच्या बिलाचा जो भुर्दंड बसतो तो बसणार किंवा काय? याबाबत ग्राहकांत संभ्रम असल्याने स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेस ग्राहकांचा विरोध आहे. त्यामुळे ग्राहकांच्या परवानगी शिवाय असे मीटर बसविण्यात येऊ नये, अशी मागणी काही ग्राहकांकडून करण्यात येत आहे. याबाबत वीजवितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांना ग्राहक संघटनेकडून सविस्तर निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती ग्राहक संघटनेचे कॉ. संजय नांगरे, दत्तात्रय फुंदे, प्रीतम उर्फ पप्पू गरजे यांनी दिली.