शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
गेल्या वर्षीच्या हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रति टन 300 रुपये दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी मिळावा, यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाचे प्रति टन रुपये 1 हजार 100 प्रमाणे पहिला हप्ता दिल्याशिवाय कोणत्याही कारखान्याने ऊस तोड सुरू करू नये आदी मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.3) येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन केले.
तहसीलदार प्रशांत सांगडे, नगरच्या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी प्रवीण लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरातील ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, केदारेश्वर गंगामाई साखर कारखान्याचे प्रतिनिधी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यात साधक-बाधक चर्चा होऊन दिवाळीपूर्वी ऊस उत्पादक शेतकर्यांना मिळणार्या दुसर्या हप्त्याच्या रकमे संदर्भात साखर सहसंचालक यांनी परिसरातील कारखान्यांशी चर्चा करून ऊस उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याचा एकमुखी प्रस्ताव या बैठकीत संमत करण्यात आला.
चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, मच्छिंद्र आरले, आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक शरद शिंदे, तालुकाध्यक्ष मेजर अशोक भोसले, लक्ष्मण विघ्ने, रामेश्वर शेळके, अंबादास भागवत, नवनाथ आधाट, विकास साबळे, अमोल देवडे, माऊली मुळे, शिवाजीराव साबळे, उद्धव मापारी, बाळासाहेब गर्जे, संदीप खरड, संजय टाकळकर आदींनी सहभाग घेतला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजी मुळे परिसर दणाणून गेला. दसरा दिवाळी साठी मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला जादा रक्कम मिळावी. या रास्त मागणीच्या पाठपुराव्यासाठी साखर कारखान्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी स्वाभिमानीच्यावतीने करण्यात आली. याबाबत परिसरातील साखर कारखान्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दसर्यापूर्वी शेतकर्यांना ज्यादा रक्कम मिळण्यासाठी शासनाने लक्ष घालण्याची गरज आहे. यासाठी सदरचे धरणेआंदोलन पुकारण्यात आल्याचे स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष फुंदे यांनी यावेळी सांगितले.
साखर दर वाढल्याने एफआरपी वाढवा
एफआर पी ची रक्कम ठरवताना तीन हजार शंभर ररुपये साखरेचा भाव गृहीत धरण्यात आला होता. आज प्रत्यक्षात तीन हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल साखरेचा भाव आहे. तसेच उपपदार्थापासूनही मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असल्याने त्याचा हिस्सा ऊस उत्पादक शेतकर्यांना मिळणे आवश्यक असल्याचे शेतकरी संघटनेची मागणी आहे.