शेवगाव |तालुका/ शहर प्रतिनिधी| Shevgav
शेवगाव पोलीस पथकाच्या नाका बंदीत विना नंबरप्लेट, विना लायसन गाडी चालवणे, फॅन्सी नंबरप्लेट अशा 33 वाहनांवर केसेस करून 29 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्यावतीने देण्यात आली. रविवार शेवगावचा आठवडे असतो या दिवशी मुख्य बाजारपेठेसह विविध चौकांत दिवसभर वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. यावेळी वाहतूक कोंडी होऊन अपघात होतात. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यादृष्टिकोनातून उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी दिलेल्या सूचना व आदेशाने शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी कर्मचार्यांचे पथक तयार करून शहरांमधील व शहरालगत विविध चौकांमध्ये विना नंबर प्लेट, विना लायसन गाडी चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट अशा गाड्यांवर नाका बंदी केली.
यावेळी 11 मोटरसायकल बिगर नंबर प्लेट असल्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर कारवाई करत, नंबर प्लेट तयार करणार्यांना बोलावून या वाहनांना नंबर प्लेट तयार करून बसवल्या. यासह परवाना नसणे आणि अन्य कारणामुळे 27 वाहनांवर कारवाई करून 29 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सध्या गणेश उत्सवाच्या काळात शहराच्या मुख्य बाजारपेठेत वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उभी राहत असल्याने पोलीस निरीक्षक नागरे यांच्या सुचनेनुसार पोलीस पथकाने बाजारपेठेत फिरून ज्या व्यापार्यांनी आपल्या दुकानच्यासमोर टेबल मांडून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे. त्यांना सूचना देत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली आहेत.
शहरामधून जाणार्या नेवासे, पैठण, गेवराई, पाथर्डी, नगर या प्रमुख राज्यमार्गावर हजारो लहान मोठी व अवजड वाहने धावत आहेत. शहरामधून जाणारे रस्ते आधीच अरुंद असून दुकानांसमोर व रस्त्यावर लहान मोठी वाहने लावल्याने हे रस्ते आणखी अरुंद होऊन वाहनांना जाण्यासाठी रस्ता शिल्लक राहत नाही. त्यामुळे शहरामध्ये दिवसभर वाहतूक कोंडी होत आहे. क्रांती चौक व आंबेडकर चौकामध्ये अस्ताव्यस्त लावलेली वाहने, फळविक्रेत्यांच्या हातगाड्या, इतर हातगाड्यांमुळे बसस्थानकातून निघणार्या बस, बाहेरून आलेल्या अवजड वाहनांना रस्ताच शिल्लक राहत नसल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
पालकांनी शाळा, महाविद्यालय व इतर अल्पवयीन पाल्यांना दुचाकी वाहने चालवण्यास देवू नयेत. अन्यथा पालकांना कारवाईला सामोरे जावे लागेल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरुध्द नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. वाहन चालकांनी वाहनांची सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत.
– समाधान नागरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शेवगाव.