शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
उन्हाळ्यातील तापमानाचा पारा वाढत असताना शेवगाव शहर व तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. शहराला तर 10 ते 12 दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा केला जातोे. नाथ जलाशयजवळ असूनही शेवगावचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
शेवगाव शहराचा पाणी प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. लोकप्रतिनिधींकडून निव्वळ आश्वासने दिली जाता आहेत. सध्या नवीन पाणी योजनेचे काम चालू आहे ही जमेची बाजू आहे. मात्र, योजना प्रत्यक्षात कधी कार्यान्वित होईल, हे सांगणे कठीण आहे. शहरातील नळांना कधी 10 तर कधी 12 दिवसांनंतर पाणी कधी व किती वाजता येईल याचा नेम नसतो. नागरिकांना सतत पाणी कधी सुटणार? याकडे लक्ष देत बसावे लागते. ते शुद्ध असेलच याचीही खात्री नाही. टंचाईमुळे कोणी विचार करताना दिसत नाही. सध्या पाण्याचे जार व पाण्याच्या बाटल्यांची जोरात विक्री चालू आहे. तसेच शहरात पाण्याच्या टँकरला मोठी मागणी असून त्यासाठी एकदिवस अगोदर नंबर लावावा लागतो तरच पाणी मिळते. नगरपरिषदेला वार्षिक पाणीपट्टी भरुनही सध्या हा आर्थिक भूर्दंड सहन करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाण्यासाठी शहरात अनेक आंदोलने झाली मात्र ती हवेतच जिरली.
तालुक्यातील विविध खेडे व वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींनी गावठाण व त्याअंतर्गत येणार्या 34 वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे अॅानलाईन प्रस्ताव सादर केले आहेत. त्यातील थाटे ग्रामपंचायतीचा एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. आखेगाव, दिवटे, बाडगव्हाण, लाडजळगाव या चार ठिकाणचे स्थळ पाहणी अहवाल अप्राप्त आहेत. तर, वाडगाव, वरखेड, बेलगाव व सोनेसांगवीचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले आहेत. प्रशासनाने पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन मागणी केलेल्या गावांना तातडीने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.