Tuesday, April 23, 2024
HomeनगरAPMC Election Result : शेवगाव बाजार समितीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

APMC Election Result : शेवगाव बाजार समितीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

शेवगाव (शहर प्रतिनिधी)

शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले,  नरेंद्र घुले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी प्रणीत ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाने सर्वच्या सर्व 18 जागा मोठ्या मताधिक्क्याने जिंकून दणदणीत विजय मिळविला.

- Advertisement -

आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखालील भाजप व मित्र पक्ष प्रणीत आदिनाथ शेतकरी मंडळाला एकही जागा मिळाली नाही. तालुक्यातील बाजार समितीच्या मतदारांनी घुले यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करून सर्वच्या सर्व 18 जागा ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाच्या अधिपत्याखाली विजयी करून विश्वास व्यक्त केल्याच्या प्रतिक्रिया माजी सभापती डॉ.क्षितीज घुले यांनी व्यक्त केली.

सेवा सोसायटी विभागातून ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाचे सर्वच्या सर्व 7 उमेदवारांनी सुमारे 400 मताच्या मताधिक्क्याने विजय मिळविला. राहुल शंकरराव बेडके, यांना सर्वाधिक 632 मते मिळाली. खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन एकनाथ कसाळ यांना 631, अशोक धस 629, बाजार समितीचे माजी सभापती अनिल मडके 627 तर गणेश खंबरे 626, जमीर पटेल 619, नानासाहेब मडके यांनी 615 मते मिळवून विजय मिळविला.  

महिला विभागातून चंद्रकला कातकडे व रागिणी लांडे विजयी झाल्या. कातकडे यांना 683, तर लांडे यांना 682 मते मिळाली. इतर मागास विभागातून ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाचे हनुमान पातकळ यांनी आदिनाथ शेतकरी मंडळाच्या सोपान जगधने यांचा 443 मताधिक्क्याने पराभव केला. विमुक्त जाती भटक्या जमाती विभागातून ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाचे राजेंद्र दौंड हे 679 मते मिळवून विजयी झाले.

अपक्ष उमेदवार वसंत गव्हाणे यांना केवळ 5 मतावर समाधान मानावे लागले. ग्रामपंचायत विभागातील सर्वसाधारण गटातून ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाचे बाजार समितीचे माजी सभापती संजय कोळगे हे 537 मते मिळवून तर अशोक मेरड हे 515 मते मिळवून विजयी झाले. दुर्बल घटक विभागातून ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाच्या बोधेगावच्या माजी सरपंच प्रीती अंधारे या विजयी झाल्या. त्यांना 534 मते मिळाली. अनुसूचित जाती जमाती विभागातून घोटणचे माजी सरपंच अरुण घाडगे यांनी दणदणीत विजय मिळविला.

व्यापारी मतदार संघातून ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाचे मनोज तिवारी 158 मते व जाकीर कुरेशी 153 मते विजयी झाले. हमाल मापाडी विभागातून वडुले बु चे विद्यमान सरपंच प्रदीप काळे हे 189 मते घेवून विजयी झाले. संध्याकाळी 5 वा. मत मोजणीला सुरुवात झाली. संध्याकाळी 8 च्या सुमारास सर्व निकाल जाहीर केल्यानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी रविवारी उत्साहात विक्रमी सुमारे 98 टक्के मतदान झाले. त्यामुळे निवडणूक निकाला बाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

पाथर्डी निकाल परिणामाच्या चर्चा फोल


पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने 18 पैकी 17 जागा जिंकून तेथे निर्विवाद बहुमत मिळविल्याने शेवगावच्या बाजार समितीच्या निवडणूक निकालावर परिणाम होईल.? ग्रामपंचायत मतदार संघात क्रॉस होटिंग होईल? आदी चर्चा फोल ठरल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. 

- Advertisment -

ताज्या बातम्या