Monday, October 21, 2024
HomeनगरShevgoan Assembly Elections : मातब्बरांनी कंबर कसल्याने शेवगावमध्ये बहुरंगी लढत रंगण्याचे चिन्ह!

Shevgoan Assembly Elections : मातब्बरांनी कंबर कसल्याने शेवगावमध्ये बहुरंगी लढत रंगण्याचे चिन्ह!

शेवगाव | सुनील आढाव

विधानसभा निवडणुकीचे वारे तालुक्यात वाहू लागले मात्र आचारसंहिता लागू होताच जोर कमी झाला आहे. मागील काही निवडणुकांमध्ये मोदींचा करिष्मा व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे निर्माण झालेली सुप्त लाट व नंतरच्या काळात पंकजा मुंडे यांची मतदार संघावरील पकड या विविध फॅक्टरचा प्रभाव दिसून आला.

- Advertisement -

मात्र या निवडणुकीत पिण्याचे पाणी, पीक विमा, ताजनापूर लिफ्ट, पक्षांतील गटतट, विकास कामे, जातीय समीकरणे या घटकांचा प्रभाव कोणाला तारतो तर कोणाला अडचणीत आणतो, हे हळुवार उघड होत जाणार आहे.

पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात आचारसंहितापूर्व काळात उमेदवारीबाबत जनमानसात हवा करण्यासाठी धार्मिक कथा, मेळावे, करमणूक प्रधान कार्यक्रम, जाहीर सभा, विविध स्पर्धा व बक्षिस वितरण असे कार्यक्रम झडले. जेवणावळीही उठल्या. मात्र हे निवडणूक तोंडावर आल्याचे लक्षण आहे, हे मतदार जाणून होते. मात्र यावर्षीची दीपावली मतदारांना निवडणुकीमुळे गोड जाणार यात शंका नाही.

यापूर्वी मतदार संघात दुरंगी लढती झाल्या. मात्र यावेळी भाजपा आमदार मोनिका राजळे, अपक्ष म्हणून माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव ढाकणे, जनशक्ती विकास आघाडीच्या हर्षदा काकडे, वंचितकडून प्रा. किसन चव्हाण सध्या विधानसभेचे मैदान गाजवणार असे दिसते. या मातब्बर उमेदवारांमुळे लढत बहुरंगी ठरण्याची चिन्हे आहेत.

आमदार राजळे या विकास कामांची आठवण मतदारांना करून देत आहेत. तर घुले १० वर्षांत उठवला आहे. सध्या दोन इच्छुक उमेदवार पाथर्डी तालुक्यातील तर तीन शेवगाव तालुक्यातील आहेत. अधिकृत उमेदवारी घोषित झाल्यानंतर जाहीर सभा, प्रचाराचा, आरोपांचा, आश्वासनांचा धुरळा उडणार आहे. राजळे, घुले, काकडे, ढाकणे गटाकडून प्रचाराचे सूक्ष्म नियोजन झालेले दिसत आहे.

२०१९ च्या निवडणुकीत राजळे व ढाकणे यांच्यात लढत झाली. मात्र त्यावेळी घुले व ढाकणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र होते. राजळे यांना १ लाख १२ हजार ५०९ तर ढाकणे यांना ९८ हजार २१५ मते मिळाली. ढाकणे यांचा १४२९४ मतांनी पराभव झाला होता. वंचितचे किसन चव्हाण यांना ९ हजार ५९९, बसपाचे सुभाष साबळे यांनी ११२४, राईट टु रिकॉलचे धिरज बताडे यांना ३६४, अपक्ष कमरूद्दीन शेख यांना ३१२, सदाशिव शिंदे यांना ३४८, संदीप शेलार यांना १११२ मते मिळाली होती. तर नोटाला २१८६ मतदारांनी पसंती दिली.

२०१४ मध्ये मोनिका राजळे यांना १ लाख ३४ हजार ६८५ मते मिळाली होती. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तत्कालीन आमदार चंद्रशेखर घुले यांचा ५३ हजार १८५ मतांनी पराभव केला होता. घुले यांना ८१ हजार ५०० मते मिळाली होती. २००९ मध्ये ७४.५० टक्के मतदान झाले होते. २०१४ मध्ये ७२. ८६ टक्के तर २०१९ मध्ये ६५.६५ टक्के मतदान झाले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या