शेवगाव (शहर प्रतिनिधी)
तालुक्याचे गाव असलेल्या 50 हजारांवर लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहरातील जनतेला 35 ते 40 वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेच्या कामाला यंदाच्या नवरात्र उत्सवाच्या काळात सुरुवात होत आहे. यामुळे महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरणार असल्याचे समाधान असल्याचे आ. मोनिका राजळे यांनी सांगितले.
सरकारच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान अंतर्गत शेवगाव शहराच्या पाणी योजनेच्या कार्यक्रमात राजळे बोलत होत्या. आ. राजळे म्हणाल्या, शेवगाव व पाथर्डी तालुक्यात कधीही भेदभाव केला नाही. शेवगाव शहरातील जटिल बनलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबतही शासनाच्या स्तरावरून गेल्या सात ते आठ वर्ष सतत पाठपुरावा केला. सुरूवातीला योजनेला मंजुरी मिळाली मात्र, ठेकेदाराने कामाला सुरुवात केली नाही.
दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे या कामात अडथळा आला. स्व पक्षातील काहींसह विरोधकांकडून आरोप झाले. आता काहींकडून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. परंतु ज्याचे श्रेय त्याला मिळाले पाहिजे. ज्यांचा सुतराम संबंध नाही, अशांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे. काहींनी दहा वर्षांपूर्वी वेगवेगळ्या विकास कामांचे किमान पोते भरून नारळ फोडले, असल्याची टीका केली.
नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सविस्तर माहिती दिली. आगामी 25 ते 30 वर्षांचे नियोजन गृहीत धरून पुढील 2051 वर्षांची शहराची सुमारे 90 हजार लोकसंख्या गृहीत धरून पाणीपुरवठा योजनेची आखणी करण्यात आल्याचे ते म्हणाले. नगरपरिषदेचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र सनेर यांचे प्रतिनिधी हिरालाल वाघ यांच्यासह अधिकारी यावेळी हजर होते.