Tuesday, November 26, 2024
Homeब्लॉगरोज आतला आवाज ऐकून जगण्यासाठी...!

रोज आतला आवाज ऐकून जगण्यासाठी…!

शिक्षणजीवनात बाहेर डोकावण्यासाठी नाही , तर आत डोकावण्यासाठी आणि आतला आवाज ऐकण्यासाठी घ्यायचे असते. जे सतत स्वतःत डोकावत राहाण्यास शिकविते तेच खरे शिक्षण . आपल्या अवती भोवती खूप काही आहे त्याचा लोभ होणे समजण्यासारखे आहे. मात्र या लोभाच्या पाठलागातून माणंसाची खरी ओळख पुसली जाते आणि खोटा मुखवटा लावून जगावे लागते. त्या मुखवटयामुळे सत्व जपले जाण्याची शक्यता नाही.

मुखवटयाने जगणारी माणस केवळ हुशार असतील पण ती शहाणपण धारण करणारी असतीलच असे नाही. त्यामुळे जीवनाच्या प्रवासात प्रत्येकात दडलेल्या सत्वाची ओळख होण्यासाठी आतला आवाज ऐकायला शिकायला हवे. आतला आवाज म्हणजे काय असते? तर तो केवळ विवेक असतो.

- Advertisement -

विवेकाने चालणार्‍या माणसाला प्रत्येक पाऊल टाकण्यासाठी एक वाट निश्चित मिळत असते. ती वाट हमखास प्रत्येकाला स्वआंनदाच्या शिखरावर घेऊन जात असते हे लक्षात घ्यायला हवे. म्हणून शिक्षणाने शहाणपण पेरायचे म्हणजे काय तर विवेकाची कास धरून जीवनाला अर्थ प्राप्त करून देणे असते.

शिक्षणाने मागे मागे धावणे घडता कामा नये. शिक्षण म्हणजे अनुकरण करणे नव्हेच. प्रत्येकाचे आत जे दडले आहे त्या दडलेल्या सत्वाला, क्षमतेला बाहेर काढणे म्हणजे शिक्षण असते. बाहेर दिसते ते शिकणे यात फार काही नवल नाही. मात्र प्रत्येकाच्या आत एका उंचीची गोष्ट दडली आहे. त्या उंचीचा शोध घेण्यासाठीचा पाठलाग करीत राहाणे म्हणजे शिक्षण असते. आपल्यात जे काही आहे त्याचा शोध लगेच लागेल असे होणारही नाही. त्यासाठी सतत स्वतःला काय हवे आहे याचा विचार करायला हवा.

काय मिळाले म्हणजे आपल्याला जीवनातील सर्वाधिक आनंदाच्या क्षणाचे वाटेकरी होता येईल ते ठरवायला हवे. ते एकदा ठरवले , कीआपल्याला वाट चालत राहाता येईल. अनेकदा ते ठरविता येत नाही हीच मुळात अडचण असते. त्यामुळे एकाच गोष्टीत एकाला आनंद मिळतो आणि एकाला दुःख मिळते. याचे कारण कोणी तरी आतला आवाज ऐकलेला असतो आणि कोणीतरी बाहेरच्या आवाजाचा पाठलाग करीत फिरत असतो.

एका साधूकडे एक व्यक्ति राहात असते. तो साधू आपल्याला काही तरी देईल अशी त्याची अपेक्षा असते. अनेक दिवस जातात पण तो साधू काही देत नाही. त्या साधूच्या सहवासात राहूनही त्याला आतला आवाज ऐकू येत नाही. अनेकदा कोठे गेल्यावरती आणि कोणाच्या सहवासातून काय मिळवायचे हे कळावे म्हणून विवेक असावा लागतो. तो शिक्षणातून यायला हवा असतो. त्या प्रमाणे त्या शिकलेल्या माणंसाला साधूकडून भौतिकसुखाचीच अपेक्षाच होती. त्याला तर सतत बाहेरचाच आवाज ऐकू येत होता.

अखेर एक दिवस जाण्यासाठी निघाला तर तो साधू म्हणाला जाता आहात तर ही भेट घेऊन जा. या माणंसाने साधूने दिलेली भेट उघडून पाहिली तर ती याला अपेक्षित असलेल्या भेटीसारखी भेट नव्हतीच. ती होती एका कापडात गुंडाळलेला चप्पलजोड. जी चप्पल तुटली होती, कुजली होती. मात्र आता ती जर साधूने दिली आहे म्हणून सोबत बाळगायला हवी असे त्यांने ठरविले. या व्यक्तिने आपल्या सोबतच्या साहित्यासोबत ती भेट बांधून घेऊन आपला प्रवास सुरू केला.

घराची वाट धरली असतांना रोज एका गाव मुक्काम होऊ लागला.पुन्हा सकाळी उठायचे आणि पुन्हा प्रवास , पुन्हा मुक्काम असे सुरू राहीले.एका मुक्कामात एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती रस्त्याने जात होती. त्या व्यक्तीला आपल्या गुरूची स्पर्शीत झालेल्या वस्तूचा गंध अवतीभोवतीच्या परीसरात येत होता. त्या वस्तूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो.तेव्हा त्या वस्तू या व्यक्तीकडे असल्याचे लक्षात येते. तेव्हा ती श्रीमंत व्यक्ती त्या चप्पला स्वतःकडे घेतो आणि त्या मोबदल्यात त्यांना सोने नाणे देतो. खरेतर त्या चप्पलांकरीता त्या व्यक्तीने इतका संपत्ती का दिली असेल, असा प्रश्न कोणालाही पडेल..

पण त्याला आतला आवाज ऐकू आला होता. त्यामुळे संपत्तीपेक्षा त्याला गुरूच्या स्पर्शीत वस्तू महत्वाच्या वाटल्या होत्या. आणि दुसर्‍याला त्या गुरूच्या स्पर्शित वस्तूपेक्षा संपत्ती महत्वाची वाटली होती. अनेकदा जीवनात असे घडते. त्यामुळे शिक्षणाने आतला आवाज ऐकण्याची शक्ती, बळ देण्याची गरज आहे.

भारतीय राजकारणात देखील असा आतला आवाज ऐकू आल्यावर अनेकांनी सत्तेचे महाजालाचा त्याग केला आहे. माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांना स्वतः पंतप्रधानानी पुन्हा राष्ट्रपती व्हा. त्याकरीता अर्ज सादर करावा अशी अपेक्षा व्यक्त करीत अर्ज भरण्याची विनंती केली होती. त्यांनी आतला आवाज ऐकून स्पष्ट नकार दिला.

रेल्वेचा अपघात झाला म्हणून माजी पंतप्रधान आणि तत्कालीन रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यासारखी कितीतरी उदाहरणे आपल्या अवतीभोवती आहेत. हा त्याग म्हणजे आतला आवाज आहे. आतल्या आवाजाने उत्तम समाज निर्माण होईल. त्या आवाजात सद्सद्विवेक असतो. त्या विवेकाचा हमरस्ता व्यक्तीला सतत जमिणीवर राहाण्यासाठी मदत करीत असतो. म्हणून गांधीजी या देशाला मिळाले.

महात्मा गांधी हे सतत आतला आवाज ऐकत होते. म्हणून त्यांनी जीवनभर एक प्रकारची निरपेक्षता जपली. त्यामुळे त्यांना महात्मा म्हणून संबोधित केल्यावर ते स्वतः म्हणत मला महात्मा संबोधित करू नका. कोणाचेही अंधानुकरण करू नका.सतत विवेकाची कास धरा. आपण सतत चिकित्सक असायला हवे. त्यांनी मीराबेन यांना लिहिलेला एक संदर्भ लक्षात घेतला, तर आतल्या आवाजाचे काय महत्व आहे हे लक्षात येईल. ते म्हणत प्रत्येकाला स्वतःच्या मार्गाने जाऊनच स्वतःची प्रगती साधली पाहिजे. इतर कोणी सांगितले आणि ते जर तुम्हाला पटत नसेल, पसंत नसेल, तर ते सगळे काही तुम्ही नाकारले पाहिजे.

प्रत्येकाने आपले स्वतःचे स्तित्व जपले पाहिजे. स्वतःचे अस्तित्व जपणे म्हणजे आतला आवाज ऐकणे असते.त्यामुळे जीवनात यशाच्या शिखरावर न्यायचे असेल तर शिक्षणाने प्रत्येकाला आतला आवाज ऐकण्यासाठी लागणारी शक्ती विकसित करायला हवी.

समाजात स्वतःचा आवाज नसलेली अनेक माणस आपल्या अवतीभोवती आहेत. बाहय आवाजात त्यांचे आस्तित्व विरून गेले आहे. त्यामुळे केवळ दुस-याच्या इशा-यावर आणि दुस-याच्या सुखासाठी त्यांना जगावे लागते. त्यांना बाहेरचा आवाज ऐकू येतो पण स्वतःचा येत नाही.

परीक्षेत नापास झालेल्या आईन्स्टाईन यांनी आतला आवाज ऐकला आणि स्वतःची पाऊलवाट निर्माण करून यशाचे शिखर गाठले. ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या आतील आवाजाचा शोध घेतला आणि त्या मार्गाने चालत राहिले त्यांनी त्यांनी जगाच्या इतिहासावर स्वतःची छाप निर्माण केली आहे. त्यामुळे शिक्षणातून काय दिशेने प्रवास सुरू ठेवण्याची गरज आहे हे लक्षात येईल.

आपण जेव्हा स्वतःचा आतला आवाज ऐकतो तेव्हा आपल्या कृतीने कोणाला त्रास तर होत नाही ना ! याची जाणीव सतत आंतरिक धारणेत असते. त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. आपल्याला कोणाचे फुकट काही नको ही धारणा पक्की होत जाते.त्यामुळे लाचारी संपते आणि स्वाभिमान जोपासला जातो. त्याच बरोबर क्षमाशील वृत्ती देखील निर्माण होते.

समाजात आज जी हिंसा दिसते आहे. भ्रष्टाचार दिसतो आहे त्यावर मात करण्याचा हा उपाय आहे. आपण फुकटचा पैसे खातो ही भावना आतल्या आवाजाने निश्चित पश्चातापाला कारणीभूत होईल. कोणत्याही कृत्याला मोठी शिक्षा म्हणजे पश्चाताप असतो. ते सहजतेने होईल. खरेतर शिक्षणातून स्वतःत डोकावण्यास जरी शिकविले तरी समाज अधिक उत्तम निर्माण होईल.शिक्षणाने उत्तम समाज निर्मितीचे आव्हान पेलणे म्हणजे माणूस निर्माण करणे असते. त्यामुळे एका दिशेचा हा प्रवास व्यक्तीला उंच भरारी घेण्यास शक्ती देईल. त्यातून राष्ट्र उन्नत बनेल यात शंका नाही.आपण प्रदर्शनीय बनण्यापेक्षा दर्शनीय बनण्यासाठीची पाऊल उचलूया… त्यासाठी रोज आतला आवाज ऐकून जगण्यासाठी पाऊल टाकूया..

-संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या