संगमनेर | Sangamner| संदीप वाकचौरे
शालेय कामकाजाच्या 234 दिवसांची निश्चिती झाल्यानंतर शालेय वेळापत्रक सुद्धा राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये नमूद करून देण्यात आले आहे. त्यानुसार वर्षभरात तिसरी ते पाचवी या पूर्वतयारी गटासाठीचे विविध विषयांचे 1 हजार 872 तासिका कामकाज चालेल, तर 1 हजार 92 घड्याळी तास कामकाज होणार आहे. सहावी ते आठवीसाठी 1 हजार 872 तासिकांचे अध्यापन वर्षभरात होणार आहे. नववी ते दहावीसाठी 1 हजार 638 तासिका निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. दैनंदिन वेळापत्रकाचा विचार करता दहा मिनिटांची एक व चाळीस मिनिटांची एक अशा दोन सुट्ट्या दिवसभरात विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.
इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय भाषा यांच्यासाठी वर्षभरात प्रत्येकी 234 तासिका राखीव असणार आहेत.
सरासरी प्रत्येक भाषेसाठी 137 घड्याळी तास भाषेचे अध्यापन होणार आहे. सध्याच्या प्रचलित अभ्यासक्रमाच्या तासिकांमध्ये प्रथम भाषेसाठी सर्वाधिक तास आहेत, मात्र सध्याच्या आराखड्यात प्रत्येक भाषेसाठी समान तासिका स्वीकारण्यात आल्या आहेत. गणित व आपल्या सभोवतालचे जग या विषयांसाठी प्रत्येकी 312 तासिका व वर्षभरात 182 तास उपलब्ध असणार आहेत. कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण, कार्यशिक्षण यासाठी 156 तासिका असून सरासरी प्रत्येकी 91 घड्याळी तास अध्यापन होणार आहे. कब बुलबुलसाठी 78 तासिका वर्षभरात उपयोगात आणल्या जाणार आहेत. त्यासाठी घड्याळी 46 तास अध्यापन होईल. आठवड्यातून भाषा विषयांसाठी प्रत्येकी सहा तास, गणित व परिसर यासाठी आठ तास, कला, कार्यानुभव शारीरिक शिक्षण या विषयांसाठी आठवड्यातून चार तासिका निर्धारित करण्यात आलेल्या आहेत.
इयत्ता सहावी ते आठवीसाठी भाषेच्या प्रत्येकी 156 तासिका असणार आहेत. तिन्ही भाषांसाठी वर्षभरात प्रत्येकी 91 घड्याळी तास उपलब्ध होणार आहेत. गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र यांच्यासाठी वर्षभरात प्रत्येकी 234 तासिका उपलब्ध होणार आहेत, तर वर्षभरात 136 घड्याळी तास या विषयासाठी राखीव असणार आहेत. कला, शारीरिक शिक्षण या विषयासाठी प्रत्येकी 156 तासिका मिळणार आहेत. याचा अर्थ घड्याळी 91 तास अध्यापनासाठी मिळणार. व्यावसायिक शिक्षणासाठी 234 तासिका म्हणजे वर्षभरामध्ये घड्याळी 136 तास उपलब्ध असणार आहेत. स्काऊट व गाईड या विषयासाठी 78 तासिका असून 46 तास घड्याळी अध्यापन होणार आहे. त्याचबरोबर या स्तरावर वर्षभरामध्ये 78 तास ग्रंथालयासाठी राखीव असून वर्षभरात 46 तास विद्यार्थी ग्रंथालयातील तासिकांचा वापर करणार आहेत. दर आठवड्याला एक तास दहा मिनिटे यासाठी दिले जाणार असून त्यात आठवड्याचे दोन तास राखीव असणार आहेत. ग्रंथालयाच्या तासिका या नव्याने आराखड्यात समाविष्ट झाल्या असल्याने विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीला बळ मिळेल, अशी शक्यता आहे.
इयत्ता नववी ते दहावीसाठी तिन्ही भाषांचा विचार करता प्रत्येकी 156 तास उपलब्ध असणार असून घड्याळी 104 तास अध्यापनासाठी मिळणार आहेत. गणित, विज्ञान विषयासाठी 195 तासिका म्हणजे वर्षभरात 130 घड्याळी अध्यापन होईल. सामाजिक शास्त्रासाठी 234 तासिका, घड्याळी 156 तास मिळणार आहेत. आंतरविद्याशाखीय शिक्षणासाठी 78 तासिका, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण यासाठी 78 तासिका म्हणजे वर्षभरामध्ये प्रत्येकी 52 तास अध्यापन होणार आहे. व्यावसायिक शिक्षणासाठी 234 तासिका राखीव असून वर्षभरात 156 घड्याळी तास व्यावसायिक शिक्षण दिले जाणार आहे. स्काऊट गाईडसाठी 78 तासिका ठेवण्यात आल्या असून एकूण घड्याळी 52 तास अध्यापन केले जाणार आहे. नववी व दहावीसाठी अतिरिक्त समृद्धीकरणासाठी 234 तास राखून ठेवण्यात आले.
या तासिका विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या कोणत्याही विषयात सक्षम करण्यासाठी अतिरिक्त वेळ म्हणून वापराव्या लागणार आहेत. कला, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण यांसारख्या विषयांबरोबर शाळेद्वारे सराव, आंतरशालेय स्पर्धा, विषय क्लब इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी विषय निवडल्यास अतिरिक्त समृद्धीकरण तासिका वापरता येणार आहेत. त्याचबरोबर या स्तरावर ग्रंथालयासाठी स्वतंत्र तासिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत, तरी अतिरिक्त समृद्धीकरण तासिकेतील तासिका ग्रंथालयासाठी वापरता येणार आहेत. त्याचबरोबर आंतरविद्याशाखीय क्षेत्र हे नवीन अभ्यासक्रमाचे क्षेत्र असल्याने त्यालाही अभ्यासक्रमात स्थान देण्यात आले आहेत. या वर्गासाठी 1872 तासिका अध्यापन होणार आहेत.
सकाळी नऊला भरणार शाळा
राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये प्रस्तावित वेळापत्रक व तासिका यांचे नियोजन देताना सकाळी 9 ते दुपारी 3.55 असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. सकाळी 9 ते 9.25 या कालावधीमध्ये परिपाठाचे नियोजन अपेक्षित आहेत. त्यानंतर 11.25 पर्यंत पहिल्या तीन तासीका पूर्ण होतील, त्यानंतर दहा मिनिटांची छोटी सुट्टी असेल. 11.35 ला तासिका सुरू होऊन बारा पन्नासपर्यंत दोन तासिका पूर्ण होतील. त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत चाळीस मिनिटांची मोठी सुट्टी असेल. दुपारी दीड वाजता शाळा भरल्यानंतर दुपारी साडेतीनपर्यंत तीन तासिका पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रस्तावित वेळापत्रकात प्रत्येक तासानंतर पाच मिनिटे पुढील विषयाच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नववी-दहावीच्या वर्गांसाठी शेवटची तासिका 3.55 ला संपणार आहे.