संगमनेर | Sangamner| संदीप वाकचौरे
राज्य अभ्यासक्रम आराखड्या संदर्भाने राज्याच्या शैक्षणिक कामकाजाचे दिवस आणि शालेय वेळापत्रक संदर्भाने महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये अध्यापन कालावधीच्या अनुषंगाने वर्षभरामध्ये उपलब्ध होणार्या वेळेचा पुरेपूर वापर करण्यासंदर्भात विचार करण्यात आला आहे. शालेय परिपाठासाठी 15 ते 25 मिनिटांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. वर्षभरातील 234 दिवस कामकाज, 52 रविवार, 79 इतर सुट्ट्या असे एकूण 365 दिवसांचे कामकाज चालणार आहे.
केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या कामकाजाचे स्वरूप लक्षात घेता 1 एप्रिल रोजी शैक्षणिक वर्ष सुरू होते व 31 मार्च रोजी संपते. सदर शाळांना एक महिन्याची उन्हाळी सुट्टी असते. सत्र समाप्तीनंतर अथवा राष्ट्रीय सण समारंभाच्या अनुषंगाने काही दिवसांच्या दीर्घ सुट्ट्या दिल्या जातात. मे महिन्यातील सुट्टीनंतर साधारणपणे 1 जून रोजी शाळा सुरू होते. विद्यार्थ्यांना खूप दीर्घ सुट्ट्या दिल्या तर अध्ययन, अध्ययन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. राज्याचे वेळापत्रक देखील केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाप्रमाणे वेळापत्रक असावे, असे नमूद केले आहे. राज्यात सात ते साडेसात तास शाळा भरतात आणि चार ते साडेचार तास अध्यापन घडते. दोन सत्रातील शाळा असतील तर साडेचार तास अध्यापन घडते. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार रोज पाच ते साडेसहा तास अध्यापन होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील शाळा वर्षभरातील अधिक कालावधीमध्ये सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे मत आराखड्यात नमूद केले आहे.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा व श्रेयांक आराखड्यानुसार श्रेयांक पातळी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना अध्ययन कालावधी पुरेसा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यानुसार पूर्वतयारी स्तरासाठी वर्षभरात 1000 तास, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तरासाठी एक हजार दोनशे तास अध्ययन होणे आवश्यक आहे. त्यानुसार कामकाज करण्यासाठी वेळापत्रकाचे नियोजन करून देण्यात आले आहेत. इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी 35 मिनिटांची एक तासिका असणार आहे. आठवड्यात 48 तासिका व एकूण 28 तास अध्यापनाचे असतील, तर कामाचे दिवस 234 निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे राज्यात शैक्षणिक कामकाजात सर्वत्र समानता येण्याची शक्यता आहे. वर्षभराचा एकूण घड्याळी तास 1 हजार 92 निर्धारित करण्यात आला आहे.
गृहकार्य व स्वयंअध्ययनासाठीचे तास 94 असणार आहेत. सहावी ते आठवीसाठी वरीलप्रमाणे नियोजन असून 180 तास गृहकार्य व स्वयं अध्ययनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नववी ते दहावीसाठी चाळीस मिनिटांची तासिका निर्धारित करण्यात आली असून साप्ताहिक 48 तास पूर्ण होणे अपेक्षित आहेत. आठवड्याला घड्याळी एकूण 32 तास कामकाज घडणे अपेक्षित असून कामाचे दिवस 234 कायम ठेवण्यात आले आहेत. या स्तरावर 1 हजार 248 तासाचे कामकाज करणे अपेक्षित आहेत, 173 तास गृहकार्य व स्वयंअध्ययनासाठी सूचित करण्यात आले आहे.
दोन सत्रात सात तासिका
पहिली ते दहावीसाठी दिवसाला आठ तासिका गृहीत धरण्यात आलेल्या आहेत. नववी, दहावीसाठी दोन सत्रात ज्या शाळा भरतात त्यांना सात तासिकेत आपले कामकाज पूर्ण करावे लागणार आहे. तिसरी ते आठवीसाठी रोज चार तास 40 मिनिटे कामकाज करावे लागणार आहे. नववी ते दहावीसाठी पाच तास वीस मिनिटे कामकाज होणे अपेक्षित करण्यात आहे.
स्वयंअध्ययनासाठी राखीव
तिसरी ते पाचवीसाठी तीन तास, सहावी ते दहावीसाठी सहा तास स्वयंअध्ययनासाठी म्हणून राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पहिली ते तिसरीसाठी एकूण 31 तास सहावी ते आठवीसाठी 34 तास, नववी ते दहावीसाठी 38 तास शाळा कामकाज करावे लागणार आहे. शाळेच्या सहशालेय कार्यक्रम व इतर तत्सम कार्यक्रमासाठी दहा दिवस ‘दप्तराविना शाळा’ या उपक्रमासाठी वापरण्यात येणार आहेत.