संगमनेर | संदीप वाकचौरे| Sangamner
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 केंद्र सरकारने जाहीर केले. धोरणामध्ये परिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडण्यात आली आहे. शिक्षणातील मोठ्या प्रमाणावर परिवर्तन अपेक्षित केले आहे. केंद्र सरकारच्यावतीने शैक्षणिक विकासासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ राज्य सरकारने देखील राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. अभ्यासक्रमात बदल, अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात बदल अपेक्षित करण्यात आले आहेत.
राज्याची परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारचे धोरण, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा यांचा साकल्याने विचार करून राज्याच्या परिस्थितीला अनुरूप असा राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. या अभिलेखाला राज्याच्या सुकाणू समितीने मान्यता दिल्यानंतर त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य अभ्यासक्रम आराखड्याने सूचित केलेल्या प्रक्रिया संदर्भाने प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होईल. राज्य अभ्यासक्रम आराखड्याची एकूण पाच विभागांमध्ये रचना करण्यात आली आहे. पहिल्या विभागामध्ये शालेय शिक्षणाची उद्दिष्टे, आवश्यक मूल्य स्वभावपूर्ती, क्षमता आणि न्याय यांची गरज अधोरेखीत करण्यात आली आहे. दुसर्या भागामध्ये अंतरसमय क्षेत्रातील विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय ज्ञानप्रणाली, मूल्यशिक्षण, पर्यावरण शिक्षण आणि काळजी, सर्वसमावेशक शिक्षण, मार्गदर्शन आणि समुपदेशन आणि शाळांमध्ये शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर या संदर्भातील भूमिकेचे प्रतिपादन करण्यात आले आहे.
भाग तीनमध्ये शालेय शिक्षणाच्या संबंधित सर्व स्तरावरील परिभाषित अध्ययनाची मानके, आशयाची निवड, अध्यापन शा, त्या-त्या विषयासाठीची योग्य मूल्ये, मुलांसाठीची विशिष्ट मार्गदर्शन तत्त्वे यांचा समावेश करण्यात आला आहे. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विविध विषयांच्या मांडणीवर आणि श्रेणीच्या संदर्भाने या प्रकरणात अंतर्भाव करण्यात आला आहे. भाग चारमध्ये शालेय संस्कृती प्रक्रिया या संदर्भातील घटकाचा समावेश करण्यात आला आहे. सकारात्मक शैक्षणिक वातावरण सक्षम करण्यासाठी इच्छित मूल्य आणि स्वभावृती याबद्दल विवेचन करण्यात आले आहे. तर भाग पाचमध्ये शालेय शिक्षणाचा एकंदर परिसंस्थेच्या आवश्यकतेची रूपरेषा नमूद करण्यात आली आहे. राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यास सक्षम असेल. शिक्षकांची क्षमता, भौतिक पायाभूत सुविधा, त्यांची गरज, समुदाय आणि कुटुंबाची भूमिका इत्यादी घटकांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. एकूणच अभ्यासक्रम आराखडा महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने शिक्षणाची प्रक्रिया नेमकी काय आणि कशी असेल? याबद्दल सविस्तर मांडणी करणारा आहे.
समता आणि मानवता !
समाजाचे रूपांतर अधिक न्याय, समतावादी, मानवतावादी, समृद्ध शाश्वत आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान असलेल्या समाजात करणे हे नव्या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट व्यक्तिगत पातळीवर मान्य करण्यात आले आहे. आर्थिक विकास, सामाजिक न्याय, समता, संशोधन, ज्ञानाची निर्मिती, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती, पर्यावरणीय शाश्वतता, सांस्कृतिक जतन आणि चैतन्य याबाबत जागतिक स्तरावर कमान उंचवणारे सक्षम नेतृत्व तयार केले पाहिजे अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यादृष्टीने अभ्यासावर आराखड्यामध्ये विवेचन करण्यात आले आहे.