संगमनेर | संदीप वाकचौरे| Sangamner
राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलबजावणीच्या दृष्टीने केंद्र सरकार व विविध राज्य सरकार पावले टाकत आहेत. त्या प्रक्रियेपाठोपाठ राज्याच्या अभ्यासक्रमातही मोठ्या प्रमाणात बदल होणे अपेक्षित आहे. धोरणामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमालाही प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र विषय निर्धारित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर निर्धारित करण्यात आलेल्या स्तरावरील प्रस्तावित वेळापत्रकात राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या माध्यमातून तासिका उपलब्ध करून दिल्या आहेत.
वर्षभरामध्ये विद्यार्थ्याला दहा दिवस दप्तराविना शाळेत सहभागी होता येणार आहे. दप्तराविना शाळेत याचा अर्थ विद्यार्थ्याचे त्यादिवशी शिकणे घडणार नाही असे नाही. या कालखंडामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला व्यावसायिक शिक्षणासंदर्भातील सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी सुतारकाम, इलेक्ट्रिक काम, धातूकाम, बागकाम, कुंभारकाम यांसारख्या महत्त्वाच्या व्यावसायिक हस्तकलेचे नमुने तयार करणे, सराव करणे इत्यादीसाठी रचना करताना सरावावर आधारित कृतींद्वारे इयत्ता सहावी ते आठवीसाठीचा अभ्यासक्रम असणार आहे. सहावी ते आठवीचे सर्व विद्यार्थी 10 दिवसांच्या ‘दप्तराविना शाळा’ उपक्रमात सहभागी होतील. जेथे ते सुतार, माळी, कुंभार, रंगारी यांसारख्या स्थानिक व्यावसायिकांकडून त्यांच्या व्यवसायाची माहिती समजून घेतील. या उपक्रमांतर्गत सहावी ते बारावीमधील विद्यार्थ्यांना व्यावसायिक विषय शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाऊ शकते. अगदी सुट्टीच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने व्यावसायिक अभ्यासक्रमही उपलब्ध करून दिले जातील.
विविध कला, प्रश्नमंजुषा, खेळ आणि व्यावसायिक हस्तकला यांचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या समृद्धी उपक्रमांसाठी वर्षभर 10 दिवस दप्तराविना शाळा या उपक्रमाला प्रोत्साहन दिले जाईल. विद्यार्थ्यांना वेळोवेळी शाळेबाहेरील कृतींची माहिती दिली जाईल. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन यादृष्टीने महत्त्वाची ठिकाणे / स्मारके यांना भेटी देऊन तसेच स्थानिक कलाकार आणि कारागीर यांना भेटणे, गाव, तहसील, जिल्हा, राज्यातील उच्च शैक्षणिक संस्थांना भेटी देणे यांचा त्यामध्ये समावेश असेल असे धोरणात नमूद केले आहेत. धोरणाप्रमाणे राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्यात सुद्धा दहा दिवस दप्तरविना शाळेचे नियोजन केले आहे.
आनंददायी शनिवार
राज्य सरकारने यापूर्वीच आनंददायी शनिवार कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार राज्य अभ्यासक्रम आराखड्याने प्रस्तावित केलेल्या वेळापत्रकामध्ये सुद्धा शनिवार हा पूर्ण दिवस विद्यार्थ्यांचा आनंददायी असेल यादृष्टीने वेळापत्रकाची रचना केली आहे. इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी शनिवारी शारीरिक शिक्षण, स्काऊट व गाईड, कलाशिक्षण, कार्यशिक्षण यांच्या प्रत्येकी दोन तासिका निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. सहावी ते आठवीसाठी शारीरिक शिक्षण, कलाशिक्षण, स्काऊट व गाईड तसेच ग्रंथालय यांच्या प्रत्येकी दोन तासिका दर्शवण्यात आलेल्या आहेत. नववी दहावीसाठी स्काऊट व गाईड, सामाजिक शास्त्र, कलाशिक्षण यांच्या प्रत्येकी दोन तासिका शारीरिक शिक्षण व अतिरिक्त समृद्धीकरण यांच्या प्रति एक तासिका वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. नववी, दहावीसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सात तासिका एका आठवड्यात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सहावी ते आठवीसाठी व्होकेशनल एज्युकेशनसाठी सहा तासिका उपलब्ध असणार आहेत. सहावी ते आठवीसाठी कार्यशिक्षण हा विषय असणार नाही. त्याऐवजी व्यावसायिक शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. अर्थात राज्य अभ्यासक्रम आराखड्याने सूचित केलेले वेळापत्रक हे केवळ नमुना दाखल करून देण्यात आले आहे. तथापि तासिकांचा भार मात्र निश्चित मानला जाणार आहे.
आशयाचा भार होणार कमी
शिक्षण धोरणानुसार राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील अध्ययन मानकांची रचना करताना अभ्यासक्रमातील आशयाचा भार कमी करण्याचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार घोकंपटीतून सुटका करण्याबरोबर मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी आणि क्षमता विकासासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण या अभ्यासक्रमांना पुरेसा वेळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. विज्ञान विषयांमध्ये वैज्ञानिक चौकसपणा व अत्यावश्यक क्षमतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आशयाचे तर्क संगतीकरण होत असल्याने आशयाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. सामाजिक शास्त्राचा आशयाचा भाग कमी करण्यासाठी संकल्पना आधारित दृष्टिकोन ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. एकूणच सर्व अभ्यासक्रमाची रचना संकल्पना आधारित व माहितीचा बोजा कमी करणारा ठरेल असे दिसते आहे. विविध विषयाच्या अनुषंगाने करण्यात आलेली मांडणी अध्यापनाला दिशा देणारी ठरणार आहे.