Sunday, March 30, 2025
Homeनगरशिक्षणाच्या बदलत्या वाटा : अभ्यासक्रम आराखड्यामध्ये मूल्यांकनाच्या संदर्भाने नव्याने दृष्टिकोनाची मांडणी

शिक्षणाच्या बदलत्या वाटा : अभ्यासक्रम आराखड्यामध्ये मूल्यांकनाच्या संदर्भाने नव्याने दृष्टिकोनाची मांडणी

संगमनेर | संदीप वाकचौरे| Sangamner

शालेय स्तरावरील मूल्यांकन प्रक्रियेबद्दल गेले काही वर्षे सातत्याने संशय व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना मिळालेले गुण म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता असे मानले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये मूल्यांकनाच्या संदर्भाने नव्याने दृष्टिकोनाची मांडणी अभ्यासक्रम आराखड्यामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे येणार्‍या कालावधीमध्ये मूल्यांकनाच्या प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे अनिवार्य ठरणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मूल्यांकनाची ध्येय हे प्रामुख्याने पाठांतर, स्मरणावर आधारित असे मानले जात होते. आता मात्र मूल्यांकनाचे ध्येय आकारिक, क्षमता आधारित असल्याकडे कल असणार आहे. चिकित्सक विचार, वैचारिक स्पष्टता, विश्लेषण क्षमता या उच्चमूल्यात्मक क्षमता तपासण्यावर यापुढे भर देण्यात येणार आहे.

- Advertisement -

मूल्यांकनाचा विचार करताना गुणवत्ता सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. विद्यार्थ्यांचे शिकणे खरोखर योग्य पद्धतीने होते आहे का? शिक्षक, विद्यार्थी आणि संपूर्ण शिक्षणप्रणालीच यामुळे लाभ होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी अध्ययन आणि विकास अनुकूल करण्यासाठी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सातत्याने सुधारणा करण्यासाठी मूल्यांकन प्रक्रिया मदत करेल हा विचार सर्व स्तरावर करण्यात आला आहे. मूल्यांकनाचे दोन हेतू स्पष्ट करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे संपादणुकीची मूल्यांक आणि वर्गातील अध्ययन, अध्यापन प्रक्रिया व वापरलेल्या शैक्षणिक साहित्याची परिणामकारकता मोजणे या दोन उद्देशाने मूल्यांकन प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. मात्र प्रचलित मूल्यांकन प्रक्रियेमध्ये विद्यार्थी किती हुशार आहे हे ठरवण्यासाठी मार्ग म्हणून मुल्यांकनाचा विचार केला जातो.

अध्ययनाचे मूल्यमापन, अध्ययनासाठी मूल्यमापन आणि अध्ययन हेच मूल्यमापन हा विचार आराखड्यामध्ये नमूद करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययन संपादणुकीचे मोजमाप व शिक्षकाने गोळा केलेल्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे पुरावे जे अध्ययन अध्यापन प्रक्रिया मूल्यांकनासाठी माहिती प्रदान करतील. मूल्यमापन जेव्हा अर्थपूर्ण रचना केली जाते तेव्हा अधिक प्रभावी साधन म्हणून शिक्षण प्रक्रियेमध्ये उपयोगात आणले जाते. सध्याच्या मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भाने अनेक आव्हाने आहेत. सध्याचे मूल्यमापन हे यांत्रिक पद्धतीने केले जाते. आशयाचे मूल्यमापन केले जाते. क्षमतेचे मूल्यमापन केले जात नाही. बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांना ताण देणारी आहे. परीक्षेदरम्यान काही घटना घडल्यास, परीक्षेत चांगली कामगिरी न झाल्यास, अनुपस्थित राहिल्यास, पुनर्परीक्षा घेतली जात नाही. ठराविक अभ्यासक्रमाच्या क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रित केले जाते.

विद्यार्थ्यांची समज, विचार, विश्लेषण, चिकित्सा कौशल्य व क्षमता तसेच त्यांच्या अंगभूत गुणांच्या प्रगतची नोंद मूल्यमापनात होत नाही. आयुष्यातील अनुभवाची तपासणी सध्याच्या मूल्यमापन प्रक्रियेत केली जात नाही. गुणात्मक सुधारणा दिसून येत नाहीत. फक्त संख्यात्मक गुणांचे मूल्यमापन सध्या तरी मानले जाते. या आव्हानांचा विचार करून आयुष्यामध्ये त्यावर मात करण्यासाठी आराखड्यामध्ये मूल्यमापन विषयक दृष्टिकोन नमूद केला आहे. अभ्यासक्रमाची ध्येय साध्य करण्याच्या क्षमता आणि अध्ययननिष्पत्ती यांचे मापन करण्याची आवश्यकता आहे. मूल्यमापन हे रचनात्मक आणि विकासात्मक अध्ययन केंद्र असले पाहिजेत. विश्वासार्ह, विधायक अभिप्राय देणारे असले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे अर्थपूर्ण संकलन होण्यास मदत झाली पाहिजे. या प्रकारची भूमिका आराखड्याने नमूद केली आहे.

मागे पडणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘कॅच अप’ योजना
मूल्यमापन प्रक्रियेमध्ये जे विद्यार्थी मागे पडलेले आढळून येतील त्या विद्यार्थ्यांना इयत्तेच्या प्रारंभीच चार ते सहा आठवड्याचे सक्षमीकरण कार्यक्रम घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भाषा किंवा गणित वर्गाचा एक भाग म्हणून योग्य, स्पष्ट कार्यक्रम व साहित्यासह घेण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अतिरिक्त गृहपाठाबाबत शिक्षकाकडून पाठपुरावा करण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. हे सर्व करताना विद्यार्थ्यांना कोणत्याही भेदभावाला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शाळा व प्रशासनाने घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या अनियमितितेचा विचार करावा लागेल. विद्यार्थी नियमितपणे शाळेत गेला नसेल, साठ टक्केपेक्षा कमी उपस्थिती असेल आणि विद्यार्थ्याने अपेक्षित पातळी प्राप्त केली नसेल तर शाळेने, शिक्षकाने पालकांशी होणार्‍या चर्चेत या गोष्टीचा उल्लेख करावा आणि किमान आठवीसाठी तरी त्याच वर्गात पुन्हा बसण्यासाठी प्रोत्साहित करावे. विशेष कौटुंबिक आरोग्य विषयक समस्या आहे की नाही हे समजून घेण्यासाठी चर्चा करण्याची भूमिका सूचित करण्यात आली आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये पुरेशी पात्रता मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्या अनुषंगाने अहवाल तयार करण्यात येईल. तो प्रत्येक शाळेला तयार करणे अनिवार्य असेल. या अहवालामध्ये अपेक्षित पात्रता प्राप्त झालेल्यांची नावे जाहीर होणार नाहीत याची खात्री करणे आवश्यक आहे. अहवाल तालुका, जिल्हास्तरीय संकलन करून तो जनतेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

असे असेल मूल्यमापनाचे स्वरूप
सध्याच्या प्रचलित असलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमाच्या प्रक्रियासारखेच आकारिक आणि संकलित मूल्यमापन प्रक्रिया सुरू राहणार आहेत. लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, पुस्तकासह परीक्षा, स्तरीय पातळी मूल्यांकन मूलभूत आणि प्रगत, स्व-निरीक्षण, बुद्धिमापन कसोट्यांचा समावेश असेल. नकारात्मक गुणदानाचा वापर, बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश, स्पर्धा परीक्षांप्रमाणे एखाद्या परीक्षेचे नियोजन, बहुपर्यायी प्रश्न क्रमांक बदलून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणे अशा स्वरूपात मूल्यांकनाची प्रक्रिया अपेक्षित करण्यात आली आहे. मूल्यमापन प्रक्रियेमध्ये अध्ययननिश्चिती साध्यता मोजणे अपेक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकाला विविध साधन तंत्रांचा अवलंब करणे आवश्यक ठरणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी समग्र प्रगती पुस्तक
सध्या विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणार्‍या प्रगती पुस्तकापेक्षा विस्तृत असे समग्र प्रगती पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती दिले जाणार आहे. प्रगती पुस्तक घर आणि शाळा यांच्यातील संवादाचे औपचारिक माध्यम असणार आहे. या प्रगती पुस्तकामध्ये पालक, विद्यार्थी स्वतः आणि त्याचा सहकारी यांनाही मूल्यमापनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रगती पत्रकामध्ये अध्ययन क्षेत्रातील संपादित क्षमता आणि अध्ययननिश्चितीचा वैयक्तिक आणि सर्व समावेशक अहवाल प्रतिबिंबीत होणार आहे. विद्यार्थ्याची प्रगती, कल दर्शवते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या व्यक्तिगत विकासासाठी हे प्रगती पुस्तक सहाय्यभूत ठरणार आहे. विचारांशी तुलना करण्याऐवजी विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समग्र पुस्तक विद्यार्थी, पालक यांना मदत करणारे ठरेल.

गणित-विज्ञानात उत्तीर्णतेची संधी
व्यवसाय शिक्षण, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण आणि निरिमयता हे विषय अभ्यासक्रमाचे अविभाज्य भाग असणार आहे. त्यातील बहुतांश मूल्यमापन हे प्रात्यक्षिक स्वरूपात असेल. सुमारे 75 टक्के भारांश प्रात्यक्षिक कार्यासाठी, 25 टक्के भारांश हा लेखी परीक्षेसाठी शिफारस करण्यात आला आहे. विज्ञान व इतर विषयांचे मूल्यमापन देखील प्रात्यक्षिकावर आधारित असावे. एकूण मूल्यमापनाच्या 20 ते 25 टक्के भारांश प्रात्यक्षिकासाठी राखीव असावे, तर उर्वरित मूल्यमापन हे लिखीत स्वरूपात करण्यात यावे. दहावीला विज्ञान-गणितात विद्यार्थी अनुत्तीर्ण अधिक असतात. अशावेळी यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन सामान्य व विशेष अशी रचना न करता संबंधित विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची संधी देण्यात यावी किंवा विद्यार्थ्याला विज्ञान व गणित या विषयात 20 गुणांपेक्षा अधिक पण 35 पेक्षा कमी गुण असतील तर अशा विद्यार्थ्यास गुणपत्रिकेवर गणित किंवा विज्ञान किंवा दोन्ही विषय घेता येणार नाही असा शेरा मारून त्यांना उत्तीर्ण करता येईल. हा नवा विचार अभ्यासक्रम आराखड्याने नमूद केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अरे बापरे…, धुळ्यात 300 किलो बनावट पनीर जप्त

0
धुळे : (प्रतिनिधी) । अरे बापरे…, धुळ्यात बनावट पनीर तयार करण्याचा कारखाना आढळून आला असून आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार...