Saturday, July 27, 2024
Homeक्राईमशिलेगाव खूनप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

शिलेगाव खूनप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

कोंढवड |वार्ताहर| Kondhwad

राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे विजय जाधव या आरडगाव येथील तरुणाची हातपाय बांधून मुळा नदीपात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून 14 मे रोजी हत्या करण्यात आली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस पोलिसांनी अटक केली तर दोन आरोपी पसार झाले आहेत. अटक केलेल्या आरोपीला राहुरी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

मयत विजय जाधव याचा भाऊ तुकाराम अण्णासाहेब जाधव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, तुकाराम हे दि. 14 मे रोजी कामावरून घरी जात असताना त्यांना त्यांचा भाचा अरुण पवार भेटला व त्याने सांगितले की, मी शिलेगाव येथे यात्रेतून येत असताना मुळानदी पात्रात सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास विजय मामा याला दिगंबर म्हसे, राहुल जगधने हे मारहाण करीत होते तर बापू तागड हा तेथे उभा होता, असे सांगीतले. त्यानंतर तुकाराम जाधव यांनी आपले चुलते रावसाहेब जाधव यांना फोन करून सांगीतले की, विजय यास मुळानदी पात्रात मारहाण होत आहे. तुम्ही तेथे जाऊन पहा असे सांगितले. त्यांनी मुळानदी पात्रात जाऊन खात्री केली. परंतु त्यांना विजय तेथे आढळून आला नाही. रात्री विजय घरी आला नाही म्हणून त्यांनी दुसर्‍या दिवशी सकाळी सर्वांनी विजयचा नदी पात्रात शोध घेतला.

परंतु त्यांना विजय सापडला नाही. विजय सापडत नसल्याने त्यांनी विजयला मारहाण करणार्‍यांपैकी राहुल जगधने, रा. शिलेगाव याच्या घरी विचारपूस करण्यासाठी गेले असता त्यांना पाहून राहुल जगधने पळून गेला. त्यानंतर त्यांनी विजयचा शिलेगावात शोध घेतला. मात्र,त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात मिसींग दाखल केली.
राहुल जगधने हा करपरानदीच्या काटवनात लपून बसल्याची माहिती विजयच्या नातेवाईकांना समजली. त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने घटनेची कबुली दिली.

याबाबत तुकाराम अण्णासाहेब जाधव, रा. आरडगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिगंबर म्हसे, राहुल जगधने व बापू तागड, तिघे रा. शिलेगाव, ता. राहुरी यांच्यावर गु.र.नं. 581/2024 भादंवि कलम 302, 34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दिगंबर म्हसे व बापू तागड हे दोघेजण फरार असून पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी राहुल जगधने याला काल न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 मे 2024 पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या