Wednesday, June 10, 2026
HomeराजकीयSanjay Shirsat : "राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेमुळे मनसेने…"; संजय शिरसाटांचा हल्लाबोल

Sanjay Shirsat : “राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेमुळे मनसेने…”; संजय शिरसाटांचा हल्लाबोल

मुंबई । Mumbai

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरू केली असून, यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलेले हे दोन्ही नेते आता निवडणुकीसाठीही सोबत लढणार, असे मानले जात आहे.

- Advertisement -

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. यामुळे एकीकडे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये (मविआ) या संभावित युतीवरून ‘धुसफूस’ सुरू झाल्याचे चित्र आहे. राज-उद्धव एकत्र आल्यास मविआतील घटक पक्षांना जागा वाटपावर फेरविचार करावा लागू शकतो.

या राजकीय घडामोडींदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “लाव रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी स्वतःचा व्हिडिओ बघावा,” असा थेट टोला शिरसाट यांनी लगावला आहे. मंत्री शिरसाट म्हणाले की, “राज ठाकरे काल काय बोलले आणि आज काय बोलतात, याबाबत ते स्वतःच संभ्रमात आहेत. त्यांच्याच जुन्या भाषणांप्रमाणे ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे करून पाहिल्यास, उबाठा गटाबद्दल त्यांची पूर्वीची विधाने समोर येतील.” राज ठाकरे यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्येही ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे, असा दावा त्यांनी केला.

राज ठाकरेंनी शिवसेना सोडताना ‘बाळासाहेब ठाकरेंना ‘बडव्यांनी’ घेरल्यामुळे शिवसेना सोडत आहे,’ असे म्हटले होते. आता मात्र ते त्याच नेत्यांकडे (उद्धवसेना) जात आहेत, याकडे शिरसाट यांनी लक्ष वेधले. “मनसेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमच्यावर टीका करणे टाळावे,” असा सल्लाही त्यांनी दिला. शिरसाट यांनी यावेळी राज ठाकरेंना प्रश्न विचारला, “जे तुम्हाला जमले नाही, ते आम्ही (शिंदे गट) करून दाखवले. आम्ही कधीही तुमच्यावर टीका केली नाही, उलट तुमचा सन्मानच केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज ठाकरे त्यांना भेटायला आले होते, तेव्हाही आम्ही त्यांचा आदरच केला. मग आता राज ठाकरे यांना आमच्यावर टीका का करावीशी वाटते?”

राजकीय टीका करताना मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनाही लक्ष्य केले. “रोहित पवार हे ‘ब्लॅकमेलर’ आहेत,” असा गंभीर आरोप शिरसाट यांनी केला. ते रोज काहीतरी बोलून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी काळात ‘ब्लॅक लिस्ट’ मध्ये रोहित पवार टॉपर असतील, अशी बोचरी टीका शिरसाट यांनी केली. यामुळे आता शिरसाट आणि पवार यांच्यात नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar Crime News : त्र्यंबकेश्वरमध्ये चार हॉटेल्सवर गुन्हे; ग्राहकांच्या नोंदी...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) सुरक्षेचा मोर्चा हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकांकडे वळवला आहे. पोलिस अधीक्षक डॉ....