मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल लागताच महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये जमण्याचे आदेश दिले. पुढचे तीन दिवस ते त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. शिवसेनेच्या या निर्णयामुळे नगरसेवक फुटून मुंबईच्या राजकारणाला नवे वळण मिळणार काय, या चर्चेला तोंड फुटले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेचे २९ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. पण शिंदे यांच्या मदतीशिवाय भाजपला आपला महापौर बसवता येणार नाही, अशी स्थिती आहे. साहजिकच अशा परिस्थितीत शिंदे यांची भूमिका निर्णायक असून त्यांच्या पाठिंब्याशिवाय भाजप मुंबईत सत्तेचा सोपान गाठू शकत नाही. साहजिकच शिंदे यांनी कोणतीही राजकीय जोखीम न पत्करण्याची भूमिका घेतली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे पूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. जोपर्यंत महापालिकेत सत्तेचा दावा केला जात नाही, तोपर्यंत नगरसेवकांना एकजूट ठेवणे गरजेचे असल्याचे शिंदे यांना वाटते. त्यामुळेच सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. विरोधक किंवा अन्य पक्षांकडून नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. राजकारणात कधीही काहीही घडू शकते. साहजिकच असे घडल्यास सत्तेचे समीकरण बिघडू शकते. त्यामुळेच ही खबरदारी घेण्यात आल्याचे कळते.
११४ नगरसेवकांचा आकडा महत्वाचा
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ११४ नगरसेवकांचा पाठिंबा गरजेचा आहे. भाजपने ८९ जागा जिंकल्या आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेने २९ जागांवर विजय मिळवला आहे. शिंदे यांच्या पाठिंब्याशिवाय भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. त्यामुळे शिंदेसे यांचे महत्त्व वाढले आहे. ठाकरे बंधू, शरद पवार यांची राष्ट्रवादी यांचा एकत्रित आकडा ७२ वर जातो. काँग्रेसला २४ जागांवर यश मिळाले आहे. त्यामुळे हा आकडा ९६ वर जातो.
पळवापळवी होणार नाही : देवेंद्र फडणवीस
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या खबरदारीबाबत मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, आता पळवापळवी करण्याचे कोणतेही कारण नाही. सर्वकाही आता शांतपणे चालणार आहे. आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय करणार आहोत. त्यामुळे नगरसेवक पळवापळवीची शक्यता नाही.





