मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) ही आधुनिक काळातील संवाद आणि संपर्काचे अतिशय प्रभावी माध्यम असलेल्या समाज माध्यमात (Social Media) सक्रिय झाली आहे.
शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापनदिनाच्या मुहुर्तावर पक्षाचे “शिवसेना” (shivsenaofc) हे अधिकृत फेसबुक पेज, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटचा शुभारंभ करण्यात आला. आता या समाजमाध्यमांच्या खात्यावरून पक्षाचे निर्णय, पक्षातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, अभियान यांची माहिती वेळोवेळी देण्यात येईल. तसेच शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका यावरून प्रसारित करण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी शिवसेनेत अभूतपूर्व बंड (Rebellion) घडवून आणले. विधानसभेतील ४० आमदार (MLA) आणि लोकसभेतील १३ खासदारांच्या पाठिंब्यावर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी उभा दावा सांगितला. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर गेल्या वर्षभरात न्यायालयीन लढाईत शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर मात केली. भारत निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे यांना बहाल केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन शिंदे यांच्या गटाने अधिकाधिक लोकांपर्यंत विशेषतः तरुणाईपर्यंत पोहचण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अमलबजावणी शिवसेनेच्या वर्धापनदिनापासून सुरु झाली आहे. वेगवान पद्धतीने विकासकामे मार्गी लावण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीमुळे राज्यातील नागरिकांचा शिवसेनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
शिवसेनेच्या याच कार्याची, विकासकामांची (Development Works) माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचावी यासाठी पक्षाचे अधिकृत फेसबुक पेज, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटचा शुभारंभ करण्यात येत आहे. यावरून यापुढे पक्षाचे निर्णय, पक्षातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, अभियान यांची माहिती वेळोवेळी प्रसारित करण्यात येईल. तसेच शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका यावरून जाहीर करण्यात येईल. यामुळे शिवसेनेचे काम अधिक व्यापक स्वरूपाने राज्यातील नागरिकांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. याच बरोबर सर्व शिवसैनिकांशी याद्वारे थेट संवाद साधणे सोपे होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी पक्षाच्या या उपक्रमाला पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन शिंदे गटाच्या वतीने करण्यात आले आहे.