शिरसगाव |वार्ताहर| Shirasgav
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आल्याने विखे, मुरकुटे, आदिक गटाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरु झाली आहे. थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने ते पद महिला अनुसूचित जातीसाठी आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. महिलेस पद असल्याने इच्छुक उमेदवारांचा अपेक्षाभंग झाला आहे.
निवडणुकीत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा गट, अविनाश आदिक यांचा गट, माजी आ. भानुदास मुरकुटे यांचा गट अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. गावच्या विकासाच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कोणता पक्ष कोणाशी युती करतो व दुहेरी लढत कशी होईल हे पण पाहण्याचे गरजेचे आहे. सध्या माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीची सत्ता आहे. तिहेरी लढतीचा सत्तासंघर्ष होण्याचे सध्यातरी चित्र आहे. इच्छुकांनी तयारी सुरु केल्याने ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची होणार आहे.
ना. राधाकृष्ण विखे पाटील गटाचे नेतृत्व गणेश मुदगुले, युवा नेते अविनाश आदिक गटाचे नेतृत्व किशोर पाटील तर माजी आ. भानुदास मुरकुटे गटाचे नेतृत्व आबासाहेब गवारे करणार आहेत. सध्या प्रशासक राज असल्याने अनेक अडचणी येत होत्या. मुदत संपल्याने अनेक कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. निवडणूक लांबणीवर पडतच होती. मागील आठवड्यात मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.
शिरसगाव ग्रामपंचायतीसाठी एकूण 6 प्रभाग असून प्रभाग 1 मध्ये 1008, प्रभाग दोन मध्ये 725, प्रभाग 3 मध्ये 1037, प्रभाग 4 मध्ये 867, प्रभाग 5 मध्ये 1190, प्रभाग 6 मध्ये 1209 असे एकूण 6006 मतदार आहेत. प्रभाग 1 मध्ये सर्वसाधारण स्त्री अथवा पुरुष, 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1, प्रभाग 2 साठी सर्वसाधारण स्त्री किंवा पुरुष 1, नागरिक मागास प्रवर्ग स्त्री 1, सर्वसाधारण स्त्री 1, प्रभाग 3-अनु.जाती स्त्री किंवा पुरुष 1, सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष 1, प्रभाग क्र 4-अनुसूचित जातीसाठी स्त्री किंवा पुरुष 1, सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष 1, सर्वसाधारण स्त्री 1, प्रभाग क्र 5 नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष 1, अनु.जाती स्त्री 1, सर्वसाधारण स्त्री 1, प्रभाग 6 – सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष 1, अनु.जाती स्त्री 1, अनु.जमाती स्त्री 1 अशा एकूण 17 ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदासाठी एक अशा 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
दरम्यान, निवडणुकी संदर्भात काही हरकती असल्यास दि. 21 ऑगस्टपर्यंत नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.