Friday, April 25, 2025
Homeनगरएप्रिलमध्ये शिर्डीच्या विमानतळावर नाईट लँडिंग

एप्रिलमध्ये शिर्डीच्या विमानतळावर नाईट लँडिंग

नागरी विमान वाहतूकमंत्री मोहोळ यांची माहिती || नगरजवळ विमानतळासाठी जागा उपलब्ध करा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शिर्डी विमानतळावरील धावपट्टीवर सध्या दिवसभर विमानसेवा आणि रात्री रिकार्पेटिंगचे काम सुरू आहे. ते काम पुढील दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षीत आहे. ते पूर्ण होताच मार्चअखेर किंवा एप्रिलमध्ये नाईट लँडिंग सेवा सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. अहिल्यानगर शहरांमध्ये होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानातील माती पूजनासाठी ते नगर दौर्‍यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अरूण जगताप आदी उपस्थित होते.

- Advertisement -

मंत्री मोहोळ म्हणाले की, शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सेवा सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे विनंती केलेली आहे. विमानतळावर ‘सीआयएसएफ’ व ‘एटीसी’च्या मनुष्यबळाची कमतरता होती. मंत्री शहा यांच्याकडे विनंती केल्यानंतर दोन दिवसांत ‘सीआयएसएफ’ चे 55 कर्मचारी नव्याने नियुक्त करण्यात आलेले आहेत. ‘एटीसी’चे कर्मचारी पण येणार आहेत. त्यामुळे तो प्रश्न बहुतांशी मार्गी लागला आहे. परंतु सध्या धावपट्टीवर दिवसभर विमानसेवा व रात्री रिकार्पेटिंगचे काम केले जाते. ते काम दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होईल व त्यानंतर लगेच नाईट लॅडिंग सुरू केली जाईल.

दरम्यान, नवी मुंबई विमानतळाबद्दल विचारले असता मंत्री मोहोळ म्हणाले, नवी मुंबई विमानतळावर मार्चअखेरपर्यंत देशांतर्गत विमानसेवा सुरू होईल. त्याचबरोबर एप्रिलअखेर आंतरराष्ट्रीय स्तरावरची विमान सेवा सुरू होईल. मुंबई ते सिंधुदुर्ग विमान सेवा सुरू न झाल्यास सिंधुदुर्ग विमानतळाला टाळे ठोकणार असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला होता त्यावर प्रतिक्रीया देताना मंत्री मोहोळ म्हणाले, सिंधूदुर्ग ते मुंबई ही विमान सेवा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, मात्र या गोष्टीचे कोणीही राजकारण करू नये असे मला वाटते. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री नीलेश राणे यांच्याबरोबर चर्चा झालेली असून लवकरच सेवा पूर्ववत होईल.

नगरजवळ विमानतळासाठी जागा उपलब्ध करा
आमदार संग्राम जगताप व त्यांच्या सहकार्‍यांनी आहिल्यानगर शहराजवळ विमानतळ असावे अशी मागणी केलेली आहे. याविषयी मंत्री मोहोळ म्हणाले, देशात कुठेही विमानतळ सुरू करायचे असेल तर राज्य सरकारने जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आ. जगताप व त्यांच्या सहकार्‍यांनाही मी विनंती केली आहे की, तुम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करून अहिल्यानगर जवळ विमानतळासाठी जागा उपलब्ध करावी. त्या जागेचे भूसंपादन झाल्यानंतर विमानतळ उभारणीसाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करता येतील.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...