Saturday, July 27, 2024
Homeनगरशिर्डी-नगर उमेदवारीसाठी ठाकरेंकडून आज चाचपणी

शिर्डी-नगर उमेदवारीसाठी ठाकरेंकडून आज चाचपणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिवसेनेत फूट पडल्यावर नगर जिल्ह्यातील शिर्डी राखीव मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डीत शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा उमेदवार कोण, याची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आज (गुरूवारी) दुपारी 12 वाजता मुंबईत मातोश्रीवर नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, शिर्डी राखीव मतदारसंघात ठाकरे गटाकडून माजी मंत्री बबनराव घोलप (नाशिक), माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (अकोले, नगर जिल्हा) व प्रसिध्द सीताराम मामा घनदाट फाउंडेशनचे संचालक व युवा नेते संदीप घनदाट या तीन नावांची चर्चा आहे.

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुका 6-7 महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. शिवसेनेत फूट पडल्याने व मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यावर आता ठाकरे यांनी राज्यभराचा लोकसभा आढावा बुधवारपासून मुंबईत सुरू केला आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डी व नगर दक्षिण य दोन्हीं जागांचा आढावा आज होणार आहे. यासाठी नगर दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे व उत्तर प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकार्‍यांना बोलावले आहे. यात संभाव्य उमेदवारांवर चर्चा होणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीत आता काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट राहिले आहेत. जागा वाटप सूत्रानुसार शिर्डी ठाकरे गट व नगर दक्षिण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. त्यामुळे ठाकरे गटाने शिर्डीवर फोकस केला आहे, पण त्याचवेळी दक्षिणेत शरद पवार गटाला कशी मदत करता येईल, याचेही नियोजन सुरू केले आहे. शिर्डीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार लोखंडे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून मुख्यमंत्री शिंदे यांचा हात धरल्याने व यामुळे त्यांची या गटाकडून शिर्डीची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याने त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचे नियोजन ठाकरे गटाचे आहे व त्यामुळेच उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले घोलप, वाकचौरे व घनदाट यांच्या समर्थकांचे उद्याच्या चर्चेकडे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या