Monday, June 24, 2024
Homeनगरशिर्डी, नगरसाठी उद्या मतदान : गाठीभेटींवर भर, एकमेकांवर करडी नजर

शिर्डी, नगरसाठी उद्या मतदान : गाठीभेटींवर भर, एकमेकांवर करडी नजर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

सुमारे दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असणारा प्रचाराचा धुराळा शनिवारी सायंकाळी सहा वाजता शांत झाला. आता उमेदवारांचा व्यक्तीगत गाठीभेटीवर भर असून प्रचाराच्या काळात तयार झालेले वातावरण टिकवून ठेवण्याचे आव्हान सर्वच उमेदवारांसमोर आहे. ऐनवेळी दिवशी गडबड होवू नयेत, यासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते एकमेकांवर करडी नजर ठेवून आहेत. सोबत उद्या, सोमवारी प्रत्यक्षात जास्तीत जास्त मतदान घडून आणण्याचे आव्हान राजकीय पक्षांसह उमेदवारांसमोर आहे. दरम्यान, रविवारी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रचाराचे साहित्य, पोलीस बंदोबस्त मतदान केंद्राकडे रवाना होणार आहे.

जिल्ह्यात लोकसभेसाठी शिर्डी आणि अहमदनगर असे दोन मतदारसंघात असून याठिकाणी दोन महिन्यांपासून निवडणुकीसाठी सुरू असणारा प्रचाराचा शाब्दीक संघर्ष थांबला आहे. आज रविवार हा मतदान पूर्व दिवस असून उद्या प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, बंदोबस्तासाठी पोलीस बळ, संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बलासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात राहणार आहेत. जिल्ह्यातील नगरव शिर्डी हे दोनही मतदारसंघ राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांमुळे गेल्या काही दिवसात राजकीय वातावरण चांगलेच तापले.
नगर लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात थेट लढत होत आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खा. सदाशिव लोखंडे यांचे विरोधात माजी खा. भाऊसाहेब वाघचौरे निवडणूक रिंगणात असून वंचित आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांच्यामुळे या ठिकाणी चुरस निर्माण झालेली आहे. गेल्या पंधरा दिवसाच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते संजय राऊत, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, केंद्रीय रामदास आठवले, माजीमंत्री आदित्य ठाकरे, माजीमंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे, खा. सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे, भाजप नेत्या चित्रा वाघ, माजी मंत्री राम शिंदे, आ. रोहित पवार, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सभांनी जिल्हा ढवळून निघाला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात 20 तर नगर लोकसभा मतदारसंघात 25 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने याठिकाणी निवडणूक आयोगाला प्रत्येक केंद्रावर दोन मतदान यंत्र बसवावे लागणार आहे. एका मतदान यंत्रावर 15 उमेदवारांसह 1 नोटाचे बटन आहे. यामुळे दोनही लोकसभा मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्रे ठेवावे लागणार आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक यंत्रणेच्यावतीने देण्यात आली.

1 हजार 344 मतदारांचे घरून मतदान
जिल्ह्यातील दोनही लोकसभा मतदारसंघात नोंदणी झालेल्या 85 वर्षापेक्षा पुढील आणि 40 टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असणार्‍या मतदारांना घरून मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. याचा लाभ शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 650 आणि नगर लोकसभा मतदारसंघातील 694 मतदारांनी लाभ घेतला. जिल्ह्यात 1 हजार 344 मतदारांनी घरून मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचा आनंद घेतला.

444 एसटी बसेसची मागणी
जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर या दोनही लोकसभा मतदारसंघात विधानसभेची 12 मतदारसंघ आहे. या मतदारसंघनिहाय निवडणूक साहित्य, कर्मचारी, पोलीस बंदोबस्त पुरवण्यात येणार आहे. यासाठीचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून मतदान कर्मचारी आणि साहित्य, यासह पोलीस बंदोबस्त गावनिहाय पाठवण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून एसटी महामंडळाकडे 44 बसेसची मागणी करण्यात आली असून ते उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

तगडा बंदोबस्त, राज्यभरातून कुमक
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदान केंद्रांवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यातून पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेवेळी मतदान केंद्रावर व संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. नगर जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार पोलिस बळ उपलब्ध आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, नाशिक, मुंबई अशा विविध जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिस कर्मचारी मागवण्यात आले आहेत. जिल्ह्यात 2 अपर अधीक्षक, 13 उपअधीक्षक, 34 पोलिस निरीक्षक, 262 पोलिस अधिकारी, 5 हजार 31 कर्मचारी, 3 हजार 164 होमगार्ड, तसेच राज्य राखीव दलाच्या 5 व केंद्रीय राखीव दलाच्या 2 अशा 7 कंपन्या असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या