राहाता |प्रतिनिधी| Rahata
31 डिसेंबर 2024 रोजी रविंद्र राजेंद्र चांदणे, रा.निमगाव कोर्हाळे यांनी त्याची होंडा शाईन मोटारसायकल साईबाबा सुपर हॉस्पिटलचे पार्किंगमध्ये लावली असता अज्ञात आरोपीने त्यांची मोटारसायकल चोरून नेली. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अन्वर मन्सुर शेख, रा. चांदेकसारे याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद करून त्याच्याकडून 5 लाख 70 हजार रुपये किमतीच्या 6 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पो.नि दिनेश आहेर यांना मोटारसायकल चोरी करणार्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि हेमंत थोरात व पोलीस अंमलदार मनोज गोसावी, गणेश भिंगारदे, रमीजराजा आत्तार, बाळु खेडकर, विशाल तनपुरे, अमृत आढाव, प्रशांत राठोड व अरुण मोरे यांचे पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अन्वर मन्सुर शेख, रा.चांदेकसारे, ता.कोपरगाव याने गुन्हा केल्याचे निष्पन्न केले.
आरोपीचा शोध घेत असताना आरोपी सावळीविहीर, येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने आरोपीचा शोध घेऊन, त्यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने साईबाबा शिर्डी सुपर हॉस्पिटल येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. अधिक विचारपूस केली असता त्याने शिर्डी येथील 3 व नाशिक जिल्ह्यामधून 3 अशा 6 मोटारसायकल चोरी केल्याची माहिती दिली. चोरी केलेल्या मोटारसायकल वैभव हॉटेल, सावळीविहीर, ता.राहाता पाठीमागील काटवनात ठेवल्याचे सांगितले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन घटनाठिकाणावरून 5 लाख 70 हजार रुपये किमतीच्या 06 मोटारसायकल ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.
आरोपीने सांगितलेल्या माहितीवरून शिर्डी पोलीस स्टेशन व येवला शहर पोलीस स्टेशनला दाखल मोटारसायकल चोरीचे खालीलप्रमाणे 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपीस गुन्ह्याच्या तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.