शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाला आठ दिवसही उलटत नाही तोच शुक्रवारी माध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी वर्दळीच्या ठिकाणी खिडकीचे गज व दरवाजा तोडून 2 हॉटेल व एक किराणा दुकानाचे 55 हजार रोख रक्कम व किराणा साहित्य असे एकूण 1 लाख 14 हजाराची चोरी केली आहे. या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे दुहेरी हत्याकांडातील दोनही आरोपींच्या मुसक्या आवळल्यात पोलिसांना यश आले आहे. सध्या शिर्डीत शेकडो पोलिसांचा बंदोबस्त असतानाही पोलिसांच्या नाकावर टिच्चुन चोरट्यांनी भरवस्तीत मोठी घरफोडी केली.
यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सात दिवसांपासून दुहेरी हत्याकांडातील घटनेच्या पार्श्वभूमीवर ना. विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांनी साई संस्थान प्रशासन, महसूल प्रशासन, शिर्डी नगरपरिषद प्रशासन व खास करून शिर्डी पोलीस प्रशासनाला शिर्डीतील वाढती गुन्हेगारी कमी करण्याच्या दृष्टीने सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिर्डीतील अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे गुन्हेगार, एजेंट, पॉलिशवाले तसेच अवैध व्यवासाय करणारे यांना ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले जात आहे.
शिर्डीतील अनेक मटका किंग यांच्या घरात पोलिसांनी छापे मारी सुरू केली असून अनेकांच्या घरी मटका जुगाराचे साहित्य सापडले असून पोलीस पसार झालेल्या मटका व जुगार चालवणार्यांचा शोध घेत आहेत. शिर्डीत दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी शिर्डीतील संशयीत व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे. गुन्हेगारांचे पाळेमुळे खोदुन काढण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून पोलिसांनी रात्रीच्या वेळी अधिक गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.