राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
शिर्डी मतदार संघात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सलग आठव्यांदा विधानसभेवर गेले आहेत. विकासाचा वारू, लाडकी बहिण योजना, हिंदूत्व अणि मतदार संघातील उभे असलेले मोठे संघटन ही विखे पाटील यांच्या विजयाची कोंदणे आहेत. त्या तुलनेत विरोधी काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांना राजकीय वारसा असताना पराजयाचा सामना करावा लागला. ना. विखे यांनी शिर्डी मतदार संघाचा चेहेरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. शासकीय योजनांचा मतदार संघात दिला गेलेला लाभ, वयोश्री योजना, सरकारची लाडकी बहिण योजना, शेतकर्यांना मिळालेले विविध अनुदाने आणि भाजपाची हिंदूत्वाची निती, माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी मतदार संघात उभारलेले मोठे तरुणाईचे संघटन आणि शालिनीताई विखे पाटील यांनी बचत गटांच्याद्वारे महिलांचे मोठे संघटन उभारले.
विखे कुटुंबाचा मतदार संघाशी असलेला सततचा संपर्क, विकासाची विविध कामे, शेती महामंडळाची जमीन वर्ग 2 वरून विनामूल्य वर्ग 1 करून दिली. अशा विविध कामांमुळे विखे यांना विजय सुखकर झाला. त्यांना 1 लाख मताधिक्याची अपेक्षा होती. मात्र हे मताधिक्य 70 हजार मिळाले. शिर्डी मतदारसंघावर विखेंचे निर्विवाद वर्चस्व आहे. जनसेवा संघटना त्यांची मजबूत आहे. त्यांच्याशी कार्यकर्ते प्रामाणिक आहेत. तालुक्यातील गणेश कारखाना वगळता बहुतांशी संस्था विखे यांच्या गटाच्या ताब्यात आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीही त्यांच्या ताब्यात होती. सावळीविहीर जवळ आयटी पार्कचे नियोजन, त्याचा गाजावाजा त्यांच्या पथ्यावर पडला. प्रचारातही त्यांची आघाडी राहिली. अनेक संस्था ताब्यात असल्याने तेथील कर्मचार्यांची हक्काची मते त्यांना मिळतात.
काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे या लोणी खुर्दच्या सरपंच आहेत. त्यांनी विखे यांच्या विरोधातील भूमिका घेतल्याने मतदार संघातील विखे विरोधकांना त्यांच्यातील नेतृत्वगुणाची चुणूक दिसली. गणेश कारखान्याच्या प्रचार यंत्रणेत त्यांची भाषणे सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर पसरली. त्यातूनच काँगे्रसचे नेते बाळासाहेब थोरात यांना विधानसभेचा उमेदवार सापडला. खरे तर प्रभावती राष्ट्रवादीच्या पण निवडणुकीच्या व उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उमेदवारी मिळविली. निवडणुकीत मात्र त्यांना यश आले नाही.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रियंका गांधी यांचीही सभा झाली. त्यांच्या कार्यकर्त्यांत ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे घोगरे यांच्या विजयाची खात्री वाटत होती. परंतु विखे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना सूर सापडला नाही. त्यांनी तालुक्यात दहशतीचे राजकारण होत असल्याचे ठणकावून सांगितले. काँगे्रसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांना मोठे पाठबळ दिले. गणेश कारखान्याचे संचालक मंडळ मागे उभे राहिले. गणेश कारखान्याचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात सक्रिय राहिले. परंतु त्यांना विखेंच्या मतांच्या निम्मी मते मिळाली. भाजपाचे बंडखोर उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा यांची उमेदवारी कुणालाही साधक बाधक ठरली नाही. 1510 मते त्यांना मिळाली. ते फारसे या निवडणुकीत प्रभावी ठरले नाहीत. हे मिळालेल्या मतदानावरुन लक्षात येते.
शिर्डी मतदारसंघातून नगर-मनमाड हायवे जातो. त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्याचे काम विखे पाटलांनी पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. गोदावरी कालव्यांच्या रुंदीकरणाचा प्रलंबीत प्रश्न, आवर्तनाचे योग्य नियोजन यासारखे विषय विखे पाटलांनी हाताळावेत. तसेच अत्याधुनिक हॉस्पिटल उभारावे, उपचारासाठी पुणे मुंबईला जाण्याची गरज नको, शिर्डी संस्थानचे रुग्णालयही अत्याधुनिक करावीत, अशी सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा आहे.