Wednesday, November 20, 2024
Homeनगरशिर्डी मतदार संघात मतदान घेण्यासाठी प्रशासन सज्ज

शिर्डी मतदार संघात मतदान घेण्यासाठी प्रशासन सज्ज

आज मतदान, शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिसांसह केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान तैनात

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

218 शिर्डी विधानसभा मतदार संघातील 271 मतदान केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस, केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. शिर्डी मतदार संघात आज दि. 20 नोव्हेंबर बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 218 शिर्डी विधानसभा मतदारसंघात 8 उमेदवार निवडणूक लढवीत असून या निवडणुकीसाठी 1 लाख 49 हजार 399 पुरुष मतदार आहेत. 1 लाख 43 हजार 504 स्त्री मतदार आहेत. तर तृतीयपंथी मतदार 8 आहेत. असे एकूण 2 लाख 92 हजार 911 मतदार आहेत. सेनादलातील मतदार 341 इतके आहेत.

- Advertisement -

काल निवडणूक यंत्रणेने मतदान घेण्यासाठी 1600 मतदान कर्मचारी तसेच सुरक्षा कर्मचारी यात पोलीस कर्मचारी व केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान असा कर्मचारी वर्ग 38 बस व 78 जीपमधून त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर रवाना केले आहेत. तत्पूर्वी निवडणूक कर्मचारी यांना मतदान घेण्यासाठी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हिव्हीपॅट हे तीन यंत्रांसह तत्सम साहित्याचे वाटप करण्यात आले. मतदान कर्मचारी यांच्याबरोबरच 21 क्षेत्रिय अधिकारी यांच्याही नियुक्ती करण्यात आल्या आहेत. तसेच इतर अधिकारी यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

काल सकाळी राहाता तहसील कार्यालयाच्या आवारात उभारलेल्या पेंडॉल मध्ये साहित्य वितरणासाठी 21 टेबल वर 71 कर्मचारी यांनी हे साहित्य वितरण केले. मतदार संघात 108 ठिकाणी 271 मतदान केंद्र आहेत. सर्व कर्मचारी यांनी साहित्य ताब्यात घेतल्यानंतर साहित्य तपासल्यानंतर वाहतूक आराखड्याप्रमाणे हे कर्मचारी बस, जीप मधून रवाना झाले. 218 शिर्डी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणेने व्यवस्थित नियोजन केल्याने निवडणूक कर्मचारी यांना साहित्याचे व्यवस्थित वाटप झाले. आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 पयर्ंत मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालिमठ यांनी मिशन 75 ही संकल्पना राबविली आहे. एकूण मतदानाची टक्केवारी 75 टक्के अथवा पुढे हे साध्य होण्यासाठी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शिर्डी मतदार संघात आदर्श मतदान केंद्र तीन तयार करण्यात आली आहेत. ही मतदान केंद्र क्रमांक 30 शिर्डी, 165 लोहगाव, 167 लोणी बु. या मध्ये हे मतदान केंद्र असणार आहेत. ही मतदान केंद्र सजविली जाणार आहेत. सखी मतदान केंद्र खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहेत. यामध्ये राहाता येथील शारदा विद्यामंदिरातील 86 क्रमांकाचे बनविण्यात आले आहे. या शिवाय युवा मतदान केंद्र 53 क्रमांकाचे शिर्डी येथे उभारण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी 57 क्रमांकाचे, तसेच परदानशिन बुरखाधारी मतदान केंद्र 200 क्रमांकाचे हसनापूर व 135 क्रमांकाचे ममदापूर हे असणार आहे.

मतदानादिवशी पहाटे साडेपाच वाजता सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉकपोलची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल. मतदान प्रक्रियेत मतदारांना सहकार्य व्हावे म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची सुविधा असणार आहे. वेटींग रुम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युतपुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एनएसएस व एनसीसीचे 18 वयापेक्षा कमी वयाच्या स्वयंसेवकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवरील सुरक्षाकामी सुमारे 400 पोलीस कर्मचारी व 400 केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बलच्या कर्मचार्‍यांची सुरक्षा व्यवस्थेकामी नियुक्ती करण्यात आली आहे.शिर्डी विधानसभेतील प्रत्येक बुथवर गरजेनुसार 2 सुरक्षा कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. 11 पथकांच्या माध्यमांतून पेट्रोलिंग केली जाणार आहे.

मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग !
शिर्डी विधानसभेतील 271 मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्राचे लाईव्ह वेबकॉस्टींग करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील पडद्यावर (स्क्रीनवर) ही लाईव्ह वेब कास्टिंगच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 5.30 वाजेपासून राखीव कर्मचार्‍यांची टीम क्षणा – क्षणाला मतदान केंद्रावरील हालाचालींवर बारीक लक्ष ठेवणार आहे.

आठवडे बाजार बंद !
मतदानाच्या दिवशी लोणी, पोहेगाव, चासनळी, शिरसगाव आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 अंतर्गत शिर्डी व कोपरगाव विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक, लोणी खुर्द व कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, चासनळी, शिरसगाव येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी शिर्डी भाग शिर्डी यांनी मार्केट अ‍ॅण्ड फेअर अ‍ॅक्ट 1862 चे कलम 3,4 व 5 मधील तरतुदी अन्वये जारी केले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या