राहाता |प्रतिनिधी| Rahata
साईनगरीत दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या सुरक्षिततेवर डल्ला मारणार्या एका अट्टल आणि रेकॉर्डवरील गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या आहेत. तामिळनाडूमध्ये दरोड्याच्या गुन्ह्यात तब्बल सात वर्षे तुरुंगवास भोगून आलेल्या विकास उर्फ राहुल गोडाजी चव्हाण या सराईत चोरट्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 7 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी या कारवाईत अडीच लाख रुपये किमतीची सोन्याची लगड आणि गुन्ह्यात वापरलेली यामाहा मोटारसायकल हस्तगत केली आहे. साईनगरीत दहशत निर्माण करणार्या या टोळीचा मुख्य सूत्रधार आता पोलिसांच्या कोठडीत आहे.
धारवाड येथील एका भाविक कुटुंबातील महिलेच्या गळ्यातून पहाटेच्या सुमारास 112 ग्रॅम सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून नेल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने तांत्रिक कौशल्य आणि गुप्त बातमीदारांचे जाळे पसरवून माहिती काढली असता, श्रीरामपूरच्या अशोकनगर परिसरातील विकास चव्हाण यानेच आपल्या साथीदारासह हा धुमाकूळ घातल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून विकासला ताब्यात घेतले. त्याने शिर्डीसह राहाता, संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली.
या गुन्हेगाराचा क्राईम ग्राफ अत्यंत धक्कादायक असून, त्याने 2009 ते 2016 या काळात तामिळनाडूमध्ये दरोड्याच्या गुन्ह्याची शिक्षा भोगली आहे. बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोर्यांचा सपाटा लावला होता. सध्या या गुन्ह्यातील त्याचे दोन साथीदार गणेश चव्हाण आणि राखी चव्हाण हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे शिर्डीत येणार्या भाविकांमध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे. अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी दिलेला हा जबरदस्त दणका मानला जात आहे.





