राहाता |प्रतिनिधी| Rahata
शिर्डी (Shirdi) येथे दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) नाट्यमयरीत्या बेड्या ठोकल्या आहेत. लखन विजय काळे (रा. शेवगाव) असे अटक (Arrested) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे 5 लाख 72 हजार रुपये किमतीचे 44 ग्रॅम सोने जप्त (Gold Seized) केले आहे. या कारवाईमुळे शिर्डी आणि शेवगाव (Shevgaon) परिसरातील जबरी चोरीचे दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिनांक 18 सप्टेंबर 2026 रोजी रात्रीच्या सुमारास आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 56 वर्षीय महिला भाविक अनुराधा व्यंकटासुब्रमण्यम चेबुरी या शिर्डी बसस्थानकाकडे (Shirdi Bus Stand) जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील मालाविरुद्धचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे 28 सप्टेंबर रोजी पथकाने आरोपी लखन काळे याला शेवगाव (Shevgaon) येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचा फरार साथीदार अनिल पेन्टायन टेके याच्यासह शिर्डीतील (Shirdi) मंगळसूत्र चोरीची कबुली दिली.
आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, त्याने 8 महिन्यांपूर्वी शेवगाव तालुक्यातील घोटण (Ghotan) शिवारात एका शेतात काम करणार्या महिला मजुराचे सोन्याचे दागिने त्याचा दुसरा फरार साथीदार अजय पिराजी पवार याच्या मदतीने लुटल्याचेही उघड केले, ज्यामुळे शेवगाव पोलीस ठाण्यातील गुन्हाही निष्पन्न झाला. चोरीचा मुद्देमाल आरोपीने शेवगाव येथील एका सोनारास विकल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सोनाराला नोटीस बजावून तपासात हजर राहण्यास सांगितले.
सोनाराकडून पोलिसांनी पंचांसमक्ष 40 ग्रॅम सोन्याची लगड किंमत 5 लाख 20,000 हजार आणि 4 ग्रॅम सोन्याची लगड किंमत 52 हजार असा एकूण 5 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी लखन काळे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पाथर्डी, शेवगाव आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्यात घरफोडी व चोरीचे 10 गंभीर गुन्हे आधीच दाखल आहेत. पुढील तपासासाठी आरोपीला शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.




