राहता । Rahata
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारात आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी भोसले कुटुंबावर घरात घुसून थेट हल्ला चढवत दोन जणांचा निर्घृण खून केला.
या हल्ल्यात कृष्णा साहेबराव भोसले (वय 35) आणि त्यांचे वडील साहेबराव भोसले यांची धारदार हत्याराने हत्या करण्यात आली असून, सारखाबाई भोसले गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी गाईजाबाई या वृद्ध महिला मात्र थोडक्यात बचावल्या. त्यांना ऐकू आणि दिसत नसल्यामुळे हल्लेखोरांच्या लक्षात आल्या नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असली तरी सकाळी डेअरी चालकाला दूध घेण्यासाठी कोणीच न आल्याने शंका आली. शेजारील शेतकऱ्यांनी भोसले यांच्या घरात जाऊन पाहणी केली असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली.
पोलीस प्रशासनाने घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत तपासाला गती दिली आहे. हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाल्याची माहिती मिळाली असून, खुनामागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलिसांकडून परिसरात कसून शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण काकडी शिवारात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे.