शिर्डी (प्रतिनिधी)
साईबाबा संस्थानच्या वतीने २८ ते ३० जुलै या काळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. १ लाख ६६ हजार ५६० भक्तमंडळ सभासदांना गुरुपौर्णिमेच्या पत्रिका पाठविण्यात आलेल्या असून ई-मेलद्वारे साडेतीन लाख देणगीदार साईभक्तांना आंमत्रित करण्यात आलेले आहे. साईराज डेकोरेटर्स यांच्या वतीने विद्युत रोषणाई तर बैंगलोर येथील दानशुर साईभक्त एस. प्रकाश यांच्या देणगीतून फुलांची सजावट करण्यात येणार आहे. साईबाबांची प्रतिमेसह हत्ती व विविध प्रकारचे पक्षी साकारण्यात येणार आहेत. तसेच उत्सव काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
श्री. गाडीलकर म्हणाले, साईबाबांवर श्रद्धा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येऊन समाधीचे दर्शन घेतात. याही वर्षी ४५ पालख्यांनी नोंदणी केलेली आहे. भाविकांचे पावसापासुन संरक्षणाकरीता मंदिर व संस्थान परिसरात सुमारे ६८ हजार चौ. फुट मंडप उभारण्यात आलेला आहे. तसेच साईभक्तांच्या अतिरिक्त निवास व्यवस्थे करीता भक्तनिवास (५०० रुम), साईधर्मशाळा याठिकाणी सुमारे २८ हजार चौ. फूट निवासी पावसाळी मंडप, बिछायत व कनातीसह मंडपाची उभारणी करण्यात आलेली आहे.
उत्सव काळात साई प्रसादालयात वेगवेगळे मिष्ठान्न प्रसाद भोजनात देणेत येणार आहे. दर्शनरांगेत व परिसरात चहा व कॉफीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेल्या आहेत. उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी विविध ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आलेले आहेत. तसेच मंदिर परिसर व शिर्डी परिसरात बंदोबस्त चोख ठेवण्यासाठी संस्थान सुरक्षा विभागाचे संरक्षण कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, शिघ्र कृतीदल पथक, बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आले आहे.
२८ जुलै रोजी पहाटे ५.१५ वा. श्रींची काकड आरती, ५.४५ वाजता श्रींच्या पोथी व प्रतिमा मिरवणूक, ६ वा. व्दारकामाई मंदिरामध्ये साईसच्चरित्र ग्रंथाचे अखंड पारायणास सुरवात, ६.२० वा. श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ७ वा. श्रींची पाद्यपुजा, तर दुपारी १२.३० वा. श्रींची मध्यान्ह आरती होणार आहे. दु. १ ते ३ वा. श्री राजेश अरोरा, बाराबंकी यांचा साई भजन कार्यक्रम तर सायं. ४ ते ६ वेदश्री वैभव ओक, डोंबिवली यांचे कीर्तन तर सायंकाळी ७ वा. श्रींची धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते ९.३० यावेळेत सक्सेना बंधु, दिल्ली यांचा साई भजन, रात्रौ ९.१५ वा. श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. श्रींची शेजारती रात्री १० वा. होईल. या दिवशी अखंड पारायणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे.
उत्सवाच्या मुख्य दिवशी, बुधवारी पहाटे ५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वा. अखंड पारायणाची समाप्ती होवून श्रींचे पोथी व प्रतिमा मिरवणूक होईल. सकाळी ६.२० वा. श्रींचे मंगलस्नान व दर्शन. सकाळी ७ वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी ७.१५ वा. लेंडीबाग येथे ध्वजपूजन तर दुपारी १२.३० वा. श्रींची मध्यान्ह आरती होणार आहे. दुपारी १ ते ३ वा. यावेळेत डॉ. मोनिका साई, लखनऊ यांचा साई भजन कार्यक्रम, दुपारी ४ वा. वेदश्री वैभव ओक यांचे कीर्तन, सायं. ७ वा. श्रींची धुपारती होईल. रात्री ९.१५ बा. श्रींचे रथाची गावातुन मिरवणुक होईल. रात्री १० ते पहाटे ६ श्रींचे समोर इच्छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. या दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहील. त्यामुळे २९ जुलै रोजीची नित्याची शेजारती व दिनांक ३० जुलै रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.
उत्सवाच्या सांगता दिनी ३० जुलै रोजी पहाटे ६ वा. श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ६.५० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी ७. वा. श्रींचे गुरुस्थान मंदिर येथे रुद्राभिषेक सकाळी १० वेदश्री वैभव ओक यांचे काल्याचे कीर्तन व दहीहंडीचा तर दुपारी १२.१० वा. श्रींची मध्यान्ह आरती होईल. रात्रौ १०. वा. श्रींची शेजारती होईल. किर्तन व निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर होणार असल्याचे श्री. गाडीलकर यांनी सांगितले.
या वर्षीचा श्री गुरुपौर्णिमा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे, समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहे




