शिर्डी (प्रतिनिधी)- श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने दिनांक 4 जुलैपासून सुरू असलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता काल काल्याच्या किर्तनानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते दहीहंडी फोडून झाली.
काल उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे 4.30 वाजता श्रींची काकड आरती झाली. त्यानंतर पहाटे 5.10 वाजता श्रींना मंगलस्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी 6.00 वाजता संस्थानचे पुजारी विलास जोशी यांनी सपत्नीक समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली तर सकाळी 7.30 वाजता पुजारी चंद्रकांत गोरकर यांनी सपत्नीक गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा केली. सकाळी 10.00 वाजता पुजारी उल्हास वाळुंजकर यांच्या काल्याच्या किर्तनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डोंगरे यांच्याहस्ते दहीहंडी फोडण्यात आली.
याप्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, दिलीप उगले, मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते. त्यानंतर 12.30 वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. सायं.7.00 वाजता धुपारती व रात्री 10.30 वाजता शेजारती झाली.