शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
खेड्यापाड्यात दिसणारा बिबट्या आता चक्क साईनगरीत दाखल झाला आहे. गेल्या आठ दिवसांत शहराच्या दक्षिणबाजुंच्या उपनगरात त्याचे अनेकदा दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाच्या कर्मचार्यांनी या परिसराची पहाणी केल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
पानमळा परिसरातील बागा व शेतीमध्ये या बिबट्याचे वास्तव्य आहे़ गेल्या आठवड्यात पानमळ्यातील अनिल कचरू कोते यांच्या वस्तीवर त्याचा वावर आढळला. सीसीटीव्ही मध्ये तो कैद झाला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून साईसंस्थानचे साईनिवास भक्तनिवासाचे अधीक्षक राजेंद्र यशवंत कोते यांच्या पेरूच्या बागेत व लगतच्या मका लावलेल्या शेतात तसेच परिसरात त्याचा वावर आहे. यामध्ये चार बछडे व एक मादी असल्याचे राजेंद्र कोते यांनी सांगितले. यामुळे आमच्या भागात भितीचे वातावरण असून बिबट्यामुळे आमच्या पेरूच्या बागेतून पेरू चोरीला जायचे बंद झाल्याचे राजेंद्र कोते यांनी सांगितले.
शिर्डीत साईभक्त, व्यवसायीक व संस्थान कर्मचार्यांच्या ड्युट्या यामुळे रात्री एक वाजेपासून पहाटे तीन वाजेपर्यंत नागरिकांची ये जा सुरू असते. अनेक भाविक तसेच स्थानिक नागरीक महिला पहाटेच्या काकड आरतीला किंवा रात्री साडे दहा वाजता संपणार्या शेजारतीला जात असतात. या बिबट्यांच्या बातमीने अनेकांच्या मनात भितीने घर केले आहे. आज वनविभागाच्या कर्मचार्यांनी या परिसराला भेट देवून बारकाईने शेतातील पावलांच्या ठशांची पहाणी केली. या परिसरात तत्काळ पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा व नागरिकांना दहशत मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिर्डी शहरातील लोकवस्तीत बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मादी बिबट्यासह चार बछड्यांनी नागरिकांना दर्शन दिल्याने लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांनी पहाटे व रात्री घराबाहेर जाताना काळजी घ्यावी. वन विभागाच्या अधिकार्यांनी तात्काळ पिंजरा लावून मादी बिबट्या व बछड्यांना जेरबंद करावे.
– ताराचंद कोते, ग्रामस्थ