Saturday, July 27, 2024
Homeनगरशिर्डीच्या जागेवरून उद्धव ठाकरेंसमोर पेच

शिर्डीच्या जागेवरून उद्धव ठाकरेंसमोर पेच

मुंबई | Mumbai

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा देखील आढावा घेण्यात आला. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पराभवासाठी कामाला लागा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या. मात्र, शिर्डी लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची यावरून उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून मातोश्रीवर खल सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

शिर्डीमध्ये लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरेंसमोर पेच निर्माण झाला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यात जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी घोषित होताच माजी मंत्री बबनराव घोलप यांची मातोश्रीवर धाव घेतली आहे.

बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत भाऊसाहेब वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पाच वेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले होते. बबनराव घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमून नव्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्याच्या उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या होत्या.

उद्धव ठाकरे यांनी मात्र जुन्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्याने बबनराव घोलप अस्वस्थ झाले होते. त्यामुळं त्यांनी काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेना पक्षातील फुटीनंतर महिनाभरानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडत 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. त्यांच्यामध्ये शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा देखील समावेश होता. शिर्डीची जागा मिळवण्यासाठी ठाकरेंकडून भाऊसाहेब वाकचौरेंना बळ देण्याचा निर्णय होण्याची शक्यता असताना बबनराव घोलप अस्वस्थ झाल्यानं ठाकरे या स्थितीवर मार्ग काढत शिर्डीची जागा कशी मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या