Thursday, June 13, 2024
Homeनगरलोखंडेंबाबतची नाराजी दूर करण्यात विखे, मुरकुटे व आदिकांना अपयश

लोखंडेंबाबतची नाराजी दूर करण्यात विखे, मुरकुटे व आदिकांना अपयश

  • अशोक गाडेकर

शिर्डी लोकसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खा. सदाशिव लोखंडे यांच्याबाबत असलेली नाराजी दूर करण्यात ना. राधाकृष्ण विखे, माजी आ. भानुदास मुरकुटे व राष्ट्रवादीचे अविनाश आदिक, माजी आ. भाऊसाहेब कांबळे या सर्वच प्रमुख नेत्यांना अपयश आले. त्यामुळे गेल्या निवडणुकीत लोखंडे यांना मिळालेल्या मताधिक्याचा आकडा गाठता आला नाही.

- Advertisement -

शिर्डी लोकसभा निवडणुकीचा अपेक्षित निकाल जाहीर झाला. महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेना गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. यात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी प्रमुख भूमिका बजावली. याच श्रीरामपूर मतदारसंघाने सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना तब्बल 21 हजार 458 मतांची आघाडी दिली होती. या निवडणुकीत मात्र ती तब्बल दहा हजारने घटली. गेल्या निवडणुकीत एवढे मताधिक्य देवूनही लोखंडे यांनी श्रीरामपूरच्या जनतेकडे दुर्लक्ष केले. दहा वर्षे खासदारकी मिळूनही जनतेशी संपर्क ठेवला नाही.

त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यापासून त्यांच्याबाबत मतदारसंघात प्रचंड नाराजी होती. असे असले तरी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पटारे, विधानसभा समन्वयक नितीन दिनकर, आध्यात्मिक आघाडीचे बबन मुठे यांच्यासह अनेक नेते लोखंडे यांच्या विजयासाठी झटले, मात्र लोखंडे यांच्याबाबत मतदारांमध्ये असलेली नाराजी ते दूर करु शकले नाही. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात लोखंडे यांना 86 हजार 545 तर वाकचौरे यांना 74 हजार 960 मते मिळाली. लोखंडे यांना केवळ 11 हजार 585 मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे अपेक्षित म्हणण्यापेक्षा गेल्या निवडणुकीत मिळविलेल्या मताधिक्याचा आकडाही सदाशिव लोखंडे गाठू शकले नाही.

त्यात या निवडणुकीत पूर्वश्रमीच्या काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असेलेल्या मात्र शिर्डी लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज होवून ऐनवेळी वंचीत आघाडीत प्रवेश करुन उमेदवारी केलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी या मतदारसंघात मिळवलेली 22028 मते दुर्लक्षून चालणार नाही. या निवडणुकीत त्यांची उमेदवारी नसती तर काँग्रेसची हक्काची असलेल्या या मतांपैकी 90 टक्के मते भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पारड्यात पडली असती तर या मतदारसंघात लोखंडे यांना मिळालेली साडेअकरा हजाराची आघाडीही दिसली नसती.

या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयासाठी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आ. लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचीन गुजर, अरुण पाटील नाईक, डॉ. वंदना मुरकुटे, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा समन्वयक संजय छल्लारे, जिल्हा उपप्रमुख सचीन बडधे, अशोक थोरे, लखन भगत, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले यांच्यासह काँग्रेस, ‘उबाठा’ शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी मोठे परिश्रम घेतले आहे. मात्र या निवडणुकीत वाकचौरे यांच्यासाठी झटणारे नेते मंडळी निवडणूक प्रचारात स्वतंत्रपणे काम करताना दिसले.

विधानसभेची रंगीत तालीम

ही निवडणूक लोकसभेची होती मात्र नेतेमंडळींनी त्यात विधानसभेची रंगीत तालीम केली. विद्यमान आ. लहू कानडे यांनी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण गेल्या साडेचार वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडतांना भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी मते मागितली. तर ससाणे गटाने विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेले हेमंत ओगले यांना मतदारसंघात फिरवून ‘मार्केटिंग’ केली. दुसरीकडे विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द घेवून शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात दाखल झालेले माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी प्रचाराच्या काळात मतदारसंघाची चाचपणी केली. तर भाजपाचे नितीन दिनकर यांनीही मतदारसंघाची ओळख करुन घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या