Saturday, July 27, 2024
Homeनगरशिर्डी विधानसभा मतदारसंघात 61 टक्के मतदान

शिर्डी विधानसभा मतदारसंघात 61 टक्के मतदान

राहाता |प्रतिनिधी| Rahata

शिर्डी विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वसाधारण 61 टक्के मतदान झाले असून मतदारांनी मोठ्या उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला. शिर्डी व लोणी येथील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदानापूर्वी ते तात्काळ बदलून देण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे.
शिर्डी विधानसभा मतदार संघात शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. मतदार सकाळीच मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदान केंद्राबाहेर रांगा दिसून आल्या. शिर्डी विधानसभा मतदार संघामध्ये एकूण मतदार 2 लाख 80 हजार 257 होते. भर दुपारीही मतदानासाठी मतदार बाहेर पडल्याचे दिसून आले. एकूणच मतदारांचा उत्साह, टक्केवारी, सोसायटी मधील बाहेर पडलेला मतदार यावरून कोण बाजी मारणार यावर ठिकठिकाणी चर्चाही रंगली होती.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील सावळीविहीर मतदान केंद्रावर दुपारी 4 नंतर मतदारांनी गर्दी केली होती. या मतदान केंद्रावर सायंकाळी 6 नंतरही मतदान सुरु होते. पुणतांबा येथे सरासरी 60 टक्के मतदान झाले. पिंपरी निर्मळमध्ये सरासरी 59 टक्के मतदान झाले. धनगरवाडीत 65 टक्के, शिंगवेत 62 टक्के, दाढ बुद्रुक येथे 62 टक्के, राजुरी येथे 68 टक्के, लोणी बुद्रुक येथे 61 टक्के, लोणी खुर्द येथे 56 टक्के, खडकेवाकडे येथे 60 टक्के, जळगाव येथे 65 टक्के, कोर्‍हाळे येथे 62 टक्के तर कनकुरी येथे 74 टक्के मतदान झाले.

सर्वच मतदान केंद्रावर सुरळीत मतदान झाले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकार्‍यांसह सर्वपक्षीय नेतेमंडळीही विविध मतदान केंद्रांना भेटी देवून आढावा घेत होते. शिर्डी लोकसभा मतदार संघात महायुतीचे सदाशिव लोखंडे व महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात प्रमुख लढत आहे. यासह 20 उमेदवार रिंगणात होते. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून कोण बाजी मारणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या