Sunday, July 7, 2024
Homeनगरचुकीचा पायंडा पाडून राज्यात आलेल्या सरकारविरुद्ध जनमत!

चुकीचा पायंडा पाडून राज्यात आलेल्या सरकारविरुद्ध जनमत!

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

देशपातळीवर भाजपकडून होत असलेले द्वेष भावनेचे राजकारण आणि राज्यांमध्ये चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार हे जनतेला मान्य झाले नसून याविरुद्ध जनतेने कौल दिला आहे. महाविकास आघाडीला भक्कम साथ दिली असून सरकारविरोधी रोष व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून अहमदनगर जिल्ह्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून होत असलेले दहशतीचे राजकारण व चुकीच्या प्रशासनामुळे त्यांचा पराभव झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांच्या प्रतिनिधींशी संगमनेरातील यशोधन कार्यालय येथे ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार थोरात पुढे म्हणाले, देशातील सध्याचे राजकारण आणि राज्य पातळीवर चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार या विरोधात जनतेमध्ये अत्यंत रोष आहे. जनतेला असे चुकीचे राजकारण मान्य नसून मतदानातून तो जनतेने तो राग व्यक्त केला आहे. सत्ताधार्‍यांकडून होत असलेला सत्तेचा गैरवापर, त्याचप्रमाणे वाढलेली बेरोजगारी, महागाई, भरतीमधील गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत गैरव्यवहार, राज्यात बिघडलेली कायदा-सुव्यवस्था यामुळे जनता या सरकारवर नाराज आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार नसतानाही सातत्याने जनतेमध्ये संपर्कात होते. त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

तसेच अहमदनगरमध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे तरुण होते. त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील, मात्र मंत्री विखे यांनी ज्या पद्धतीने दहशतीचे राजकारण करून चुकीचे प्रशासन राबवले याबद्दल जिल्ह्यात मोठा रोष निर्माण झाला. जनतेने विखे यांच्या दहशतीचे झाकण उडवले असून अजून काही बाकी आहे तेही उडणार आहे. नीलेश लंके हा एक सामान्य कार्यकर्ता आहे. कोरोना काळात त्यांनी मोठे काम केले. परंतु पारनेरमध्ये सरकारकडून निर्माण केलेली दहशत यामुळे लंके यांनी त्यांना मोठी टक्कर देऊन विजय मिळवला आहे. यावेळी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करुन जिलेबी वाटत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार..
काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार असून देशाच्या विकासाचा विचार आहे. त्याला ताकद देण्याचे काम सर्वांनी करायचे आहे. राज्यात महाविकास आघाडीला मोठे अनुकूल वातावरण असून आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून मुख्यमंत्रीही महाविकास आघाडीचाच होणार असल्याचा विश्वास आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या