Saturday, November 23, 2024
Homeनगरजिरायत टापूत ज्या उमेदवाराला आघाडी तोच होणार शिर्डीचा खासदार !

जिरायत टापूत ज्या उमेदवाराला आघाडी तोच होणार शिर्डीचा खासदार !

निळवंडे लाभक्षेत्र कोणाला तारणार

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राज्याच्या राजकारणामध्ये नावलौकिक असलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. मात्र शिर्डी मतदार संघातील पाचही तालुक्यांना वरदान ठरणार्‍या निळवंडे लाभधारक शेतकर्‍यांचा कौल ज्या उमेदवाराला मिळेल तोच यामध्ये जिंकलेला दिसेल असेच चित्र व चर्चा लाभक्षेत्रात दिसून येत आहेत.

- Advertisement -

अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर या पाच तालुक्यांमधील जवळपास 160 गावे निळवंडेच्या लाभक्षेत्रात येतात. गेल्या 53 वर्षापासून राजकारणाचा बळी ठरलेल्या निळवंडे धरणाचे काम व मुख्य कालव्यांचे काम पूर्ण झालेले आहेत. यावर्षी या दोन्ही कालव्यांची चाचणी पूर्ण करण्यात आली. दुष्काळी परिस्थिती व कायमच टंचाईला सामोरे जात असताना या भागातील शेतकर्‍यांना निळवंडे धरण कालव्यासह पूर्ण व्हावे असेच सातत्याने वाटत होते. पंधरा वर्षांपूर्वी लोकसभेला प्रथमच निवडून आलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी निळवंडेसाठी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्यानंतरच्या दहा वर्षात खासदार राहिलेले तात्कालीक खासदार सदाशिव लोखंडे यांनीही निळवंडे धरण व कालवे पूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार पातळीवर प्रयत्न केले.त्यातच गेल्या वर्षी निळवंडेचे दोन्ही कालवे तयार होऊन त्यातून याची चाचणी घेण्यात आली.कालव्या लगतच्या ओढे नाले तसेच पाझर तलाव यांच्यामध्येही पाणी सोडून शेतकर्‍यांच्या शेतात पाणी पोहोचवण्यात या काळात यश आले.

मात्र असे असले तरीही अपुरी असलेली वितरण व्यवस्था, निधीचा अभाव, रखडलेले कालव्यांचे अस्तरीकरण, उन्हाळ्यात न झालेले शेतीसाठीचे आवर्तन यामुळे जिरायत भागाला चालू वर्षी प्रचंड दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. त्यातच गेल्या 13 मे रोजी शिर्डी लोकसभेकरिता मतदान मोठ्या उत्साहात पार पडले. मतदार संघातील नेवासा तालुका वगळता उर्वरित राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर व अकोले हे पाचही तालुके निळवंडे लाभक्षेत्रात येतात. यामध्ये जवळपास 160 लाभधारक गावांचा समावेश असून जवळपास 60 हजार हेक्टर सिंचन क्षेत्र या निळवंडेच्या लाभक्षेत्रात येते.

सातत्याने असणारी दुष्काळी परिस्थिती, पडलेले शेतीमालाचे भाव, कमी झालेले दुधाचे भाव, महागाई आदी प्रश्न या निवडणुकीत प्रकर्षाने जाणवत होते. असे असले तरीही या सर्व बाबींवर एकमेव उपाय म्हणजे हक्काचे व शाश्वत पाटपाणी. गेल्या 53 वर्षापासून निळवंडे लाभधारकांची होत असलेली सशेहोलपट या पंचवार्षिकला थांबेल अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात होती. मात्र तसा कोणताही प्रकार होताना दिसला नाही. मात्र कालव्यांची झालेली चाचणी शेतकर्‍यांसाठी दिलासा देणारे ठरली ही बाब ही ऐतिहासिक होती.

दरम्यान या निवडणुकीसाठी पंधरा वर्षांपूर्वी शिवसेनेतून खासदार झालेले भाऊसाहेब वाकचौरे यावेळी उद्धव ठाकरे गट यांच्याकडून उमेदवारी घेऊन उभे राहिले होते. तर सलग दहा वर्ष खासदारकी करणारे शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली होती. दोघांचाही मतदार संघात निळवंडेच्या माध्यमातून प्रचंड लोकसंपर्क असल्यामुळे व दोघांनी निळवंडेसाठी आपल्या सामर्थ्यानिशी काम केलेले असल्यामुळे निळवंडे लाभक्षेत्रातील लाभधारक शेतकरी कोणाला मतदान करणार याबाबत तर्कवितर्क केले जात होते. कायमच राजकारणाचा बळी ठरलेल्या व निवडणूक सुरू झाली म्हणजे निळवंडेवर भाषण करणार्‍या पुढार्‍यांबाबत निळवंडे लाभक्षेत्रात आता चांगलीच जनजागृती झालेली आहे. त्यामुळे आपल्या हिताचा कोण व आपल्या विरोधात कोण याची पुरती जाणीव लाभधारक शेतकर्‍यांना झाल्याचे निवडणूक काळात दिसून आले. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांनी केलेले मतदान निर्णायक ठरणार असून निळवंडे लाभक्षेत्रातील 160 गावांमधील लाभधारक शेतकरी ज्या उमेदवाराच्या पाठीशी मताच्या रूपाने खंबीरपणे उभे राहतील तोच उमेदवार 4 जून रोजी होणार्‍या मतमोजणीत विजयी झालेला दिसेल, अशी चर्चा निळवंडे लाभक्षेत्रातून दिसून येत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या