कोळपेवाडी |वार्ताहर| Kolpewadi
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील महिला मजुरांना घरी सोडण्यासाठी येणारा पिकअप शिर्डी- नाशिक महामार्गावर वावी परिसरात गोडगे पब्लिक स्कूल समोर उलटल्याने यातील एक महिला व एक पुरुष ठार झाले तर 18 महिला व ड्रायव्हर सह दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून एक महिला अत्यवस्थ आहे. या पिकअप मध्ये महिला पुरुष अशा एकूण 21 व्यक्ती होत्या. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, मळेगाव व येवला तालुक्यातील काही मोलमजुरी करणार्या महिला व पुरुष एनएच 160 या राष्ट्रीय महामार्गाच्या लगतचे छोटे मोठे गवत काढण्याचे व साफसफाई करण्याचे कामासाठी कोळपेवाडी वरून वावी येथे नियमितपणे जाते.
त्यासाठी कोळपेवाडी वरून आपली वाहने वावी या ठिकाणी ठेवून तेथून पिकअप वाहनातून पुढे कामासाठी जात होते व संध्याकाळी पुन्हा या सर्व मजुरांना वावी येथे त्यांच्या वाहनाजवळ ठेकेदाराकडून सोडण्यात येत असे. त्याप्रमाणे बुधवार दिनांक 19 रोजी आपल्या कामाची सुट्टी झाल्यानंतर या मजुरांना कोळपेवाडी येथे जाण्यासाठी वावी येथे सोडविण्यासाठी निघालेला पिकअप एमएच 14 डीएम 1454 हा वावी जवळील गोडगे पब्लिक स्कूल समोर सायंकाळी सव्वा सहा ते साडे सहाच्या सुमारास उलटला. त्यामुळे या वाहनातील महिला व पुरुष मजूर रस्त्यावर फेकले गेले. यापैकी एक महिला गंभीर जखमी होऊन जागेवरच मयत झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच एक पुरुष देखील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना मयत झाला आहे. दुसरी एक महिला देखील अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे.
इतर महिला व दोन पुरुषांना सिन्नर व नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यापैकी काही महिलांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. मंदाबाई उशिरे व जगन राणु कोळपे हे मयत झाले असून जखमी महिलांमध्ये सुनीता शिवदे, अलका झावरे, सखुबाई माळी, लताबाई मुजगुले वैष्णवी होंडे, सुरेखा होंडे, गुड्डी कोळपे, सुमनबाई राजेंद्र सूर्यवंशी, आदिनाथ इंगळे (मळेगाव), ऋषिकेश पिसाळ (महालखेडा) समाधान कोळपे, अनिता भुतनर, ताई सुरेश गायकवाड, शिला दत्तू कोळपे, संगीता शिवदे, ललिता शिवदे, हिराबाई गर्दे, यमुनाबाई कोळपे, सुरेखा कोळपे या महिला पुरूषांचा समावेश असल्याची माहिती अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी दिली आहे. अपघात घडल्यानंतर जखमी महिलांनी हंबरडा फोडला होता. वेळेत रुग्णवाहिका दाखल झाल्यामुळे जखमींना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी महिलांमध्ये काही महिला या साठ वर्षे वयापेक्षा जास्त असल्याची माहिती हाती आली असून राष्ट्रीय महामार्गाचे स्वच्छतेचे काम घेणार्या ठेकेदाराने या मजूर महिलांचा अपघात विमा काढला आहे किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.