अहिल्यानगर (प्रतिनिधी)
साईनगर शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांसाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने साईनगर शिर्डी ते पुणतांबा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी तब्बल २३९.८० कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पास हिरवा कंदील दाखवला आहे.
येत्या काळात शिर्डीकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांना अधिक जलद, सुरक्षित आणि वेळेवर सेवा मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहे. त्याचा दूरगामी फायदा राज्याच्या विकासाला होणार आहे.
सध्या पुणतांबा-साईनगर शिर्डी हा रेल्वे मार्ग एकल आहे. त्याचा वापर केवळ १९.६६ टक्के इतकाच होत आहे. परंतु भविष्यात याच मार्गावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर दुहेरीकरण न झाल्यास या मार्गावरचा ताण ७९.७० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच रेल्वे सेवा असलेल्या या मार्गावर दुहेरी ट्रॅकची गरज होती, ती आता पूर्ण होणार आहे.
साईनगर शिर्डी ते पुणतांबा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्प सन २०२४-२५ च्या अम्ब्रेला वर्क फॉर मल्टी-ट्रॅकिंग या योजनेंतर्गत राबवण्यात येणार आहे. यामार्फत रेल्वेची वाहतूक क्षमता वाढवणे, वेळेचे नियोजन अधिक अचूक करणे आणि प्रवाशांना दिलासा देणे हे उद्दिष्ट आहे.
शिर्डीच्या दर्शनासाठी रेल्वे प्रवास होणार अधिक सुलभ
शिर्डी हे देशातील एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे. दरवर्षी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येथे येतात. दुहेरीकरणामुळे या मार्गावर अधिक गाड्या चालवता येतील, परिणामी गर्दीचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे होईल.
अर्थव्यवस्थेलाही मिळणार चालना
या रेल्वे प्रकल्पाचा फायदा केवळ भाविकांनाच नव्हे तर विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी आणि रोजंदारीवर प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांनाही होणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक जलद होईल, व्यापाऱ्यांना बाजारपेठांपर्यंत सहज पोहोचता येईल आणि या मार्गावरील ग्रामीण भागांनाही विकासाच्या प्रवाहात सहभागी होता येईल.
शिर्डी आणि नाशिक रोड मार्गे पुणे नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणालाही गती
शिर्डी आणि नाशिक रोड मार्गे पुणे या प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गासाठी अंतिम सर्वेक्षणाची कामेही सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात पुणे आणि नाशिक हे दोन महत्त्वाचे शहरे रेल्वेने जोडले जाणार असून या मार्गाचा शिर्डीलाही मोठा फायदा होणार आहे.




