शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबांच्या शिर्डीत शंभराहून जास्त वर्षाची परंपरा असलेला रंगपंचमी उत्सव (Rangpanchami Festival) मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. समाजातील सर्व घटकांतील मनामनातील मतभेद विसरून एकात्मतेच रंग येऊदे असे साईबाबांना साकडे घालण्यात आले. सायंकाळी साईबाबांच्या रथावर सप्तरंगाची उधळन करत पालखी मार्गावर भव्य मिरवणूक (Procession) काढण्यात आली होती. विश्वाला श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणार्या साईबाबांच्या रंगपंचमी (Rangpanchami) सायंकाळी पाच वाजता द्वारकामाई समोर मोठ्या जल्लोषात सुरू झाली.
तत्पूर्वी द्वारकामाई मध्ये साईबाबांच्या प्रतींमा आणि सटका यांची विधीवंत पूजा आरती करण्यात आली. त्यानंतर संस्थानच्या वतीने द्वारकामाईतून साईबाबांच्या (Sai Baba) पादुका व सटका यांची रथातून केशरमिश्रीत पाणी शिंपडून वाजतगाजत पालखी मार्गाने रथयात्रा काढण्यात आली. यावेळी मातीच्या रंगीबेरंगी रंगाची उधळन करण्यात आली. याप्रसंगी संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, पुजारी, कर्मचारी, हजारोंच्या संख्येने साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
समाज एकत्र यावा, सर्व भेदभाव नष्ट व्हावे, जात-धर्म विसरून सर्वांचा ईश्वर एकच आहेत ही भावना जोपासावी म्हणूनच सबका मालिक एक का महामंत्र देणारे साईबाबा देहधारी होते तेव्हापासून रंगपंचमी हा उत्सव (Rangpanchami Festival) साजरा केला जातो. साईबाबांची समाधी झाल्यानंतर प्रत्येक उत्सव प्रतीकात्मक स्वरूपात साजरे केले जातात. त्यापैकीच रंगपंचमी हा एक उत्सव होय. रंगपंचमी उत्सवाला साईबाबांच्या मुर्तीवर अलंकार तसेच बाबांच्या मूर्तीवर व समाधीवर सप्तरंगांची शाल चढवण्यात आली होती.
क्रांती युवक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे द्वारकामाई समोरील पटांगणात रंगपंचमी उत्सव क्रांती युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी साई के संग होली के रंग म्हणत देशातून आलेल्या भाविकांनी रंगपंचमी उत्सवात सहभागी झाले.