Tuesday, October 22, 2024
Homeनगरशुक्रवारपासून शिर्डीत साईबाबा पुण्यतिथी उत्सव - गाडीलकर

शुक्रवारपासून शिर्डीत साईबाबा पुण्यतिथी उत्सव – गाडीलकर

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्यावतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शुक्रवार 11 ते रविवार 13 ऑक्टोबर या काळात साईबाबा पुण्यतिथी उत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले. या पुण्यतिथी उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्यावतीने आकर्षक विद्युत रोषणाई व साई तिरुपती देखावा हा भव्य देखावा गेट क्र. 4 च्या प्रवेशव्दारावर उभारण्यात आला आहे. तसेच उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

श्रींच्या समाधीच्या दर्शनाकरिता साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरासह चावडी समोर, मारुती मंदिर ते शामसुंदर हॉल, समाधी मंदिराच्या दक्षिण बाजुकडील पालखी मार्ग, साई उद्यान परिसर व नविन साई प्रसादालय परिसर आदी ठिकाणी 50 हजार चौरस फुटाचे मंडप तसेच अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी भक्त निवासस्थान येथे 20 हजार चौरस फुटाचा असा एकूण 70 हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी 11 ठिकाणी विक्री केंद्र उभारले आहे. तसेच आवश्यकता भासल्यास अतिरिक्त लाडू विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. दर्शनरांगेत व परिसरात भक्तांना चहा, कॉफी व दूध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्प्लेक्स, साईआश्रम, धर्मशाळा, भक्त निवासस्थान (500 रुम), व्दारावती तसेच साई उद्यान इमारत, शांतीनिवास इमारतीतील दर्शन रांगेत तळमाळा व पहिल्या माळ्यावर चहा व कॉफीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तांच्या सोयीसाठी साधारण 8 ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.

श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या प्रथम दिवशी शुक्रवारी पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती, 5.45 वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, 6 वाजता व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायणास सुरुवात, 6.20 वाजता श्रींचे मंगलस्नान, 7 वाजता श्रींची पाद्यपूजा, 10 वा. शंकरगिरी अंबड, जालना यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती, दुपारी 4 वाजता प्रणव जोशी, जालना यांचे कीर्तन तर सायंकाळी 6.15 वाजता धुपारती होईल. उत्सवाचा हा पहिला दिवस असल्यामुळे अखंड पारायणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहील. उत्सवाचे पारायणात अध्याय वाचनासाठी भाग घेऊ इच्छिणारे साईभक्तांनी गुरुवार 10 रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 5.15 वाजेपर्यंत देणगी काउंटर नंबर 1 येथे आपली नावे नोंदवावीत. नाव नोंदणी केलेल्या साईभक्तांची त्याच दिवशी संध्याकाळी 5.20 वाजता समाधी मंदिरातील स्टेजवर चिठ्ठ्या काढून ड्रॉ पध्दतीने अध्याय वाचनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान त्या भाग्यवान अध्याय वाचकांची नावे व्दारकामाईचे बाहेरील दर्शनीय भागात व समाधी मंदिराच्या उत्तर बाजूच्या फलकावर लावले जातील.

उत्सवाच्या मुख्य दिवशी शनिवारी पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती, 5.45 वाजता अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, 6.20 वाजता श्रींचे मंगलस्नान, 7 वाजता श्रींची पाद्यपूजा, 9 वाजता भिक्षा झोळी, 10 वाजता डॉ. सविता मुळे यांचे कीर्तन, दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती तर दुपारी 1 वा. साई भजन, सायंकाळी 5 वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन, सायंकाळी 6.15 वाजता धुपारती होईल. रात्री 9.15 वाजता गावातून श्रींच्या रथाची मिरवणूक होणार आहे. रात्री 10.00 ते पहाटे 05.00 यावेळेत श्रींच्या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. तर उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्यामुळे दि. 12 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता होणारी शेजारती व दि. 13 ऑक्टोबर रोजी पहाटेची 5.15 वाजता होणारी काकड आरती होणार नाही.
ज्या साईभक्तांना भिक्षाझोळी कार्यक्रमात भाग घ्यावयाचा असेल त्यांनी आपली नावे शुक्रवार दि. 11 रोजी सकाळी 8 ते 11.30 या कालावधीत देणगी काउंंटर नंबर 1 येथे नोंदवावीत. ड्रॉ पध्दतीने 20 भाग्यवान भिक्षा झोळीधारकांची नावे जाहीर केली जातील.

उत्सवाच्या तिसर्‍या सांगता दिनी रविवारी पहाटे 5.50 वाजता श्रींचे मंगलस्नान, 6.50 वाजता श्रींची पाद्यपूजा व 7 वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी 10 वा. कैलास खरे, रत्नागिरी यांचा गोपालकाला कीर्तन व दहिहंडी, दुपारी 12.10 वाजेच्या दरम्यान श्रींची माध्यान्ह आरती होईल. सायंकाळी 6.15 वाजता श्रींची धुपारती, रात्री 10.00 वाजता श्रींची शेजारती होईल. उत्सव काळात कीर्तन कार्यक्रम आणि निमंत्रीत कलाकारांचे कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर होणार आहे. तसेच उत्सवाच्या मुख्य दिवशी शनिवार 12 ऑक्टोबर रोजी रात्री 10.00 ते 05.00 यावेळेत होणार्‍या कलाकारांच्या हजेरी कार्यक्रमासाठी इच्छुक कलाकारांनी आपली नावे त्याच दिवशी अनाउन्समेंट रुम येथे आगाऊ नोंदवावीत, असे सांगून उत्सवाच्या कालावधीत सत्यनारायण पूजा, अभिषेक पुजा व वाहन पूजा बंद ठेवण्यात येणार असल्याचेही श्री. गाडीलकर यांनी सांगितले. हा उत्सव यशस्वरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष अंजु शेंडे, सदस्य जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे प्र. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले सर्व अधिकारी, विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या