शिर्डी । प्रतिनिधी| Shirdi
तामिळनाडूतील एका साई मंदिराला पाठवण्यात आलेल्या धमकीवजा ई-मेलचा धक्का शिर्डी साई संस्थानलाही बसला. परदेशातून पाठवलेला हा ई-मेल चुकून शिर्डी साई संस्थानच्या अधिकृत ई-मेलवरही पोहोचला. मेलमध्ये साई मंदिरावर विनाशकारी पाइप बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे शिर्डीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वीही साई संस्थानला असे फेक मेल आलेले आहेत.
शुक्रवारी 2 मे दुपारी तीन वाजेपर्यंत साईमंदिर बॉम्बने उडविण्याचा इशारा मेलद्वारे देण्यात आला होता. या प्रकरणी साई संस्थानच्या वतीने सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ई मेलमध्ये सावुक्कू शंकर आणि जमिश मुबीन यांच्या फाशीच्या निषेधार्थ हल्ल्याची योजना असून यासाठी स्फोटके वापरण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा ई मेल मूळत: तामिळनाडूतील साई मंदिरासाठी पाठवण्यात आला होता. तो चुकून शिर्डी संस्थानकडेही आला. त्यामुळे हा मेल फेक असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ढिलाई न ठेवता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याबाबत तमिळनाडू प्रशासनालाही माहिती दिली आहे.
मंदिर परिसराची कसून तपासणी
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे आणि पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव अधिक तपास करत आहेत. गेले दोन दिवस अहिल्यानगर व शिर्डीच्या बॉम्ब शोध पथकाने अनेकदा मंदिर व परिसरची कसून तपासणी केली. मात्र संशयास्पद काहीही आढळले नाही.
साईदर्शन सुरळीत
मंदिर परिसरात जलद कृती दल व पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. भाविकांच्या मोबाईल, बॅगा काळजीपूर्वक तपासण्यात येत आहेत. शहरात नाकाबंदी लावण्यात आली असून हॉटेलचीही तपासणी करण्यात येत असल्याचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमणे संगितले. पोलीस आणि संस्थान प्रशासनाने साईभक्त आणि ग्रामस्थांना घाबरून न जाता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या धमकीमुळे भाविकांवर कोणताही परिणाम झाला नसून नेहमीप्रमाणे दर्शन व्यवस्था सुरळीत सुरू आहे.