शिर्डी|शहर प्रतिनिधी|Shirdi
साई मंदिर परिसरात बॉम्ब सदृश संशयास्पद वस्तू असल्याचा फोन आला आणि शिर्डीच्या स्थानिक प्रशासनाची एकच धावपळ उडाली… शिर्डी पोलीस, अग्निशमन दल, बॉम्ब शोधक आणि निवारण पथक, डॉग स्कॉड, आरोग्य पथक पुढील 15 मिनिटांत घटनास्थळी पोहचले. डॉगस्कॉड पथकाने बॉम्ब शोधत तो निकामी केला. सदर प्रकार हा माँक ड्रिलचा रंगीत तालिमचा एक भाग असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
जागतिक किर्तीचे देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेले शिर्डीचे साईबाबा मंदिर नेहमीच हाय अलर्टवर असते. देशात इतरत्र कुठेही आतंकवादी हल्ले झाले तर सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या मंदिरात राज्य सरकारच्यावतीने कडेकोट सुरक्षा यंत्रणा सज्ज केली जाते.
अशा परिस्थितीत शिर्डीत कोणतीही घातपाताची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास कशाप्रकारे सामोरे जावे यासाठी साईमंदिर प्रवेशद्वार क्रमांक 4 समोर माँकड्रिलचे प्रात्यक्षिक करण्यात आल्याची माहिती शिर्डी कार्यालयाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर साईमंदिर बंद असले तरी देखील शनिवार दि. 11 रोजी सकाळी साईमंदिर प्रवेशद्वार क्रमांक 4 समोर माँकड्रिलचे प्रात्यक्षिक करण्यात आले. शिर्डीतील साईमंदिर राज्यातील एकमेव अति गर्दीचे ठिकाण आहे. या ठिकाणी विघातक परिस्थिती निर्माण झाल्यास काय व कशाप्रकारे उपाययोजना कराव्यात, त्याचप्रमाणे येथील सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे याची चाचपणी करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली माँकड्रिलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.
दरम्यान मागील वर्षी डिसेंबर महिन्यात एनएसजी कमांडो मुंबई यांनीही आतंकवादी कारवाई अभ्यास प्रात्यक्षिके केली. त्यानंतर काल शनिवारी महाराष्ट्र पोलीस बॉम्ब शोधक पथक, अति शीघ्र कृती दल, फायर फायटर विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, साई संस्थान सुरक्षा विभाग यांच्या संयुक्तवतीने माँकड्रिलचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
यावेळी साईमंदिर प्रवेशद्वार चार समोर एका खोक्यात स्पोटकं ठेवून ते नष्ट करण्याची चाचपणी केली असून संशयित ठिकाणी अत्याधुनिक साधनांच्या सहाय्याने तसेच श्वान पथकाच्या मदतीने स्फोटक शोधून त्यानंतर स्फोटकांचा जागेवरच कमी दाबाचा स्फोट घडवून ती नष्ट करण्यात आली. मंदिर परिसरात स्फोटके किती प्रभावीपणे शोधले जाऊ शकतात याचेही प्रात्यक्षिक करण्यात आले आणि डॉग स्कॉडच्या मदतीने तातडीने निकामी देखील केले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितींकुमार गोकावे, शिर्डी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, साईमंदिर सुरक्षाचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश गुळवे, क्यू.आर.टी जवान, बॉम्बशोधक पथकातील एएसआय संदीप कोष्टी, पोलीस हवालदार मोहम्मद शेख, अरुण ससाणे, दिलीप पुरणाळे, प्रकाश साळवे, प्रताप डोळस, संतोष कुटे, पोपट शिंदे, प्रल्हाद सुंदरडे आदींसह सर्व विभागातील तसेच पोलीस कर्मचार्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.