शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी राजकीय वातावरण कमालीचे तापलेले असतानाच, शिर्डीचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताने शिर्डीत शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. गद्दार भाऊसाहेब वाकचौरे यांना शिर्डी मतदारसंघात फिरू देणार नाही, ते मतदार संघात आल्यास त्यांची धिंड काढू, असा थेट आणि संतप्त इशारा ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह शिवसैनिकांनी दिला आहे.
शासकीय विश्रामगृहावरील बैठकीत ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन कोते, उपजिल्हाध्यक्ष नाना बावके, तालुकाप्रमुख संजय शिंदे, सोमनाथ गोरे, तालुका संघटक संदीप दिघे, नानक सावंत्रे, मनोज जाधव आकाश मुंडे, ऋषिकेश चित्ते आदी पदाधिकार्यांनी माध्यमांशी बोलतांना आरोप केला की, भाऊसाहेब वाकचौरे यांनी वेळोवेळी साईबाबांची खोटी शपथ घेतली आहे. आम्ही गद्दार भाऊसाहेब वाकचौरे यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. शिवसैनिकांचे दोन रंग असतात; आम्ही खांद्याला खांदा लावून जनतेची सेवाही करतो आणि गद्दारी केल्यास त्यांची जागाही दाखवून देतो, असा इशारा यावेळी उपस्थित नेत्यांनी दिला.
गेल्या काही दिवसांपासून खा. वाकचौरे हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या चर्चांवर थेट भूमिका घेण्याचे टाळत वाकचौरे यांनी मौनम् सर्वार्थ साधनम अशी सावध भूमिका घेतली होती. मात्र बुधवारी सायंकाळी ते विमानाने अचानक दिल्लीला रवाना झाले. दरम्यान बुधवारी ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी आपला स्वतंत्र गट तयार केल्याची मोठी घडामोडी समोर आली असून यामुळे या खासदारांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकार्यांनी वाकचौरे यांच्यावर तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला. बुधवारी दिवसभरात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डीतील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देवमाणूस आहेत. त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही, परंतु शिर्डी लोकसभा मतदार संघाचे सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत जाण्याचा प्रामाणिक निर्णय घेतला आहे. ज्या जनतेने विश्वासाने निवडून दिले त्यांच्या वेदना कमी करू शकत नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून राहण्यात अर्थ उरत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उत्तरनगर जिल्ह्यात सर्वांना सोबत घेऊन हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे विचार पोहचविण्यासाठी यापुढे तळागाळात काम करणार. प्रसार माध्यमातून माझी दिशाभूल करणारी व आर्थिक विषयक चुकीची बदनामी केली जात आहे, माझे काही सहकारी रोष व्यक्त करत आहे, परंतु लोकसभा मतदारसंघातील जनमत व शिवसैनिक माझ्या या निर्णयाशी सहमत आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी व निवडून दिलेल्या जनतेप्रती स्वच्छ हेतूने घेतलेला निर्णय सामान्य जनतेला मान्य आहे. या निर्णयाचे मतदार बांधव व शिवसैनिक स्वागत करत आहे, लवकरच शिर्डीतील ताकद सिद्ध करू.
– खा. भाऊसाहेब वाकचौरे
खा. वाकचौरे मंगळवारी सायंकाळी दिल्लीला गेले आहेत. बुधवारी ते हरिद्वार येथील एका धार्मिक कार्यक्रमाला जाणार आहेत. काल रात्री माझे त्यांच्याशी बोलणे झाले होते, मात्र बुधवारी संपर्क झालेला नाही. या राजकीय चर्चांबद्दल मला सविस्तर काही माहिती नाही, मी देखील हे सगळे टीव्हीवरच पाहत आहे.
– सौ. सरस्वती वाकचौरे (खासदार वाकचौरे यांच्या पत्नी)




