Saturday, April 25, 2026
Homeक्राईमShirdi : शिर्डीत तरुणावर भरवस्तीत चाकूने वार करत टोळक्याचा धुमाकूळ

Shirdi : शिर्डीत तरुणावर भरवस्तीत चाकूने वार करत टोळक्याचा धुमाकूळ

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईनगरीतील पुनमनगर परिसरात एका परप्रांतीय तरुणावर तिघा अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद दानिश चौधरी याला चाकूने भोसकून आणि दगडांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे शिर्डीत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

दानिश चौधरी हा तरुण शिर्डीत कुरान पठणासाठी आला होता. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास तो पुनमनगर भागात फिरत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी त्याला गाठले. काही समजण्याच्या आतच त्यांनी दानिशच्या डोक्यावर बुक्क्यांनी प्रहार सुरू केला. त्यातील एकाने कमरेला खोचलेला चाकू काढून दानिशच्या पोटावर सपासप वार केले. इतकेच नव्हे तर, हल्लेखोरांकडे बंदूकसदृश शस्त्र असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.चाकूच्या वारामुळे दानिश जमिनीवर कोसळल्यानंतरही नराधमांची क्रूरता थांबली नाही. त्यांनी तिथे पडलेल्या दगडांनी दानिशचे पाय आणि गुडघ्यांवर भीषण प्रहार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दानिशने कसाबसा आपल्या वडिलांना फोन लावून माहिती दिली. स्थानिकांनी तात्काळ धाव घेत त्याला साईबाबा रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने, सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. हल्लेखोर मध्यम बांध्याचे असून त्यातील एकाने मेहंदी रंगाचा शर्ट घातला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मोटारसायकलचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 118(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

धारणगाव खडकच्या भोंदूबाबाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
शिरवाडे वाकद / लासलगाव | प्रतिनिधी Shirvade Vakad / Lasalgaon निफाड तालुयातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री...