राहाता |प्रतिनिधी| Rahata
अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण आणि निर्घृण खुनाची घटना उघडकीस आली आहे. राहाता परिसरातून बेपत्ता झालेल्या सचिन गिधे या तरुणाचा अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादातून काटा काढण्यात आला असून त्याचा मृतदेह टायर आणि डिझेलच्या साहाय्याने जाळून कोळसा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने निष्पन्न करून करुन, जीवावर उदार होऊन एका निर्जन दगडाच्या खाणीतून दहशत निर्माण करणार्या दीपक अंबादास पोकळे या सराईत गुन्हेगाराच्या तसेच त्याचे साथीदार गणेश गोरखनाथ दरेकर, प्रवीण उर्फ पन्नास वाघमारे आणि कृष्णा संतोष वाघमारे यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या कथेची सुरुवात 10 डिसेंबर 2025 रोजी झाली. शिर्डीच्या हॉलीडे पार्क परिसरात राहणारा सचिन कल्याणराव गिधे हा साई सुनिता हॉटेलमध्ये गेला होता. त्याचवेळी आरोपी प्रवीण वाघमारे याने सचिनच्या पत्नीला फोन करून तुझा पती फार माजला आहे, त्याचे हातपाय काढावे लागतील, अशी उघड धमकी दिली होती. त्यानंतर सचिन घरी परतलाच नाही. 15 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला, पण पोलिसांपुढे आरोपींचे आणि अपहृत सचिनचे मोठे आव्हान होते.
केवळ सचिनचे अपहरण करून हे आरोपी थांबले नाहीत. त्याच दिवशी त्यांनी गौतम निकाळे या तरुणालाही साकुरी शिवारात नेऊन दगडाने ठेचून त्याचे पाय फ्रॅक्चर केले होते. या घटनेत प्रवीण उर्फ पन्नास वाघमारे आणि त्याच्या इतर साथीदारांचा उघड सहभाग होता. आरोपींची ही वाढती दहशत पाहून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या मैदानात उतरवले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले आणि गुन्हेगारांचा शोध सुरू झाला.
मुख्य आरोपी दीपक अंबादास पोकळे हा रेकॉर्डवरील खतरनाक गुन्हेगार असल्याने तो वारंवार आपले ठिकाण बदलत होता. पुणे, नाशिक, खारघर, छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव अशा पाच ते सहा शहरांत पोलिसांनी त्याचा माग काढला. अखेर 6 जानेवारी 2026 रोजी दीपक पोकळे हा त्याचा साथीदार गणेश गोरखनाथ दरेकर याच्यासह संगमनेरमधील मेंढवण शिवारातील एका निर्जन दगडाच्या खाणीत लपून बसल्याची पक्की खबर मिळाली. पोलिसांनी वेळेचा विलंब न लावता मध्यरात्रीच्या सुमारास या खाणीला वेढा घातला. चोहोबाजूंनी पोलिसांनी घेरल्याचे पाहताच पोकळे आणि दरेकर यांचे अवसान गळाले आणि पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी खाकी वर्दीचा हिसका दाखवताच दीपक पोकळे याने खुनाची कबुली दिली. अनैतिक संबंध आणि आर्थिक व्यवहाराच्या वादातून सचिन गिधे याला गाठून दीपक पोकळे, गणेश दरेकर, प्रवीण वाघमारे आणि कृष्णा वाघमारे या चौघांनी मिळून त्याची निर्घृण हत्या केली. इतकेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी क्रौर्याची सीमा ओलांडली. त्यांनी मृतदेहावर टायर टाकून त्यावर डिझेल ओतले आणि प्रेत पूर्णपणे जाळून टाकले. या खुनासाठी वापरलेली 15 लाख रुपयांची विनानंबरची स्कॉर्पिओ गाडी आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दीपक पोकळे हा साधा गुन्हेगार नसून त्याच्यावर मोक्का, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि जबरी चोरी यासारखे तब्बल 17 गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिर्डी, राहाता आणि कोपरगाव परिसरात त्याची मोठी दहशत होती. या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे. पोलिसांनी आता आवाहन केले आहे की, जर या गुंडाने कोणाकडून खंडणी मागितली असेल किंवा कोणाला छळले असेल, तर त्यांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी. या गुन्ह्याचा पुढील तपास राहाता पोलीस करत असून यातील इतर आरोपींचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.





