शिरूर । तालुका प्रतिनिधी
शिरूर परिसरात एका प्रवाशाची पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीत १६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ८८ हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण २ लाख ३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिर्यादीने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना २१ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय पुणे-नगर हायवेवर नगरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसने प्रवास करत होते. व्हिजन इंटरनॅशनल स्कूलजवळ त्यांच्या बसला अचानक बिघाड आल्याने सर्व प्रवासी खाली उतरले.
या दरम्यान, फिर्यादी, त्यांची पत्नी शांतम्मा आणि मुलगा मिळून रस्ता ओलांडून गुजरमळा, शिरूर येथील साईलंच होम शेजारी असलेल्या एका मार्बलच्या दुकानात गेले. तिथे विक्रीसाठी ठेवलेली मार्बलची मंदिरे पाहण्यास ते थांबले. मार्बलची मंदिरे पाहताना शांतम्मा यांनी त्यांच्या जवळची पर्स दुकानात बाहेर विक्रीसाठी ठेवलेल्या एका मार्बलच्या मंदिराजवळ ठेवली होती. मंदिरे पाहिल्यानंतर बसकडे परत जाताना त्यांनी पर्स उचलण्यासाठी पाहिले असता, ती जागेवर दिसून आली नाही. पर्स हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली, मात्र पर्स कुठेच सापडली नाही. अज्ञात चोरट्याने पर्स लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, चोरी झालेल्या पर्समध्ये १० ग्रॅम वजनाची सोन्याची पिळ्याची अंगठी, ६.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट, ८८ हजार रुपये रोख रक्कम आणि विवो कंपनीचा मोबाईल फोन होता. एकूण चोरून नेलेल्या ऐवजाची किंमत सुमारे २ लाख ३ हजार ५०० रुपये इतकी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगताप यांनी तपास सुरू केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून चोरट्याचा शोध सुरू आहे.