Saturday, November 16, 2024
Homeनगरशिवभोजन केंद्र चालकांनी अटींचे पालन करावे : द्विवेदी

शिवभोजन केंद्र चालकांनी अटींचे पालन करावे : द्विवेदी

अहमदनगर (प्रतिनिधी)  –  प्रजासत्ताक दिनापासून सुरू होणार्‍या शिवथाळीत कोणते पदार्थ असतील याची माहिती ऑनलाईन देण्यात येणार आहे. याशिवाय थाळीचा लाभ घेणार्‍या लाभार्थींची माहिती फोटोसह अ‍ॅपवर अपलोड करण्यात येणार आहे. नगरमध्ये पाच ठिकाणी 700 थाळी लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शिवभोजन चालकांची बैठक घेऊन स्वच्छता पाळा, अटी-शर्तीचे पालन करत तक्रार येणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले.

10 रुपयांत जेवण देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी योजना प्रजासत्ताक दिनापासून (दि. 26) नगर शहरात पाच ठिकाणी सुरू होत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते योजनेस प्रारंभ होणार आहे. ग्रामीण भागातून कामानिमित्त शहरात येणार्‍या गरिबांना प्राधान्याने थाळी दिली जाणार आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील दत्त हॉटेलमध्ये प्रयोगिक तत्त्वावर पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते शिवभोजनाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरावठा विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

शिवभोजन योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. त्यासाठी व्यावसायिकांना शिवभोजन अ‍ॅप देण्यात आले आहे. ज्या ठिकाणी थाळी असेल तेथील चालकाला हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर रोज दोन तासांत येणार्‍या लाभार्थ्यांची नावगावासह माहिती अन् फोटो अपलोड करावा लागणार आहे.त्यापूर्वी शिवथाळीचा मेनू ऑनलाईन अ‍ॅपवर अपलोड करावा लागणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना ऑनलाईन मेनू पहाता येणार आहेत.

शिवथाळी केंद्र चालविणार्‍या व्यावसायिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात आयुर्वेदिक डॉक्टराकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. लाभार्थ्यांना आरोग्यदायी भोजन मिळावे हा त्यामागील उद्देश आहे. प्राथमिक स्वरूपात शिवथाळी योजनेचा तीन महिन्यांचा कार्यक्रम देण्यात आला आहे. या परिसरात फ्लेक्स लावून ग्राहकांना माहिती देण्याची सूचना दिल्या आहेत. दुपारी बारा ते दोन यावेळेत शिवथाळी मिळणार आहे. त्यानंतर हे अ‍ॅप दिवसभरासाठी बंद राहणार आहे. ऐकावेळी किमान 25 अन् कमाल 75 लाभार्थी जेवण करतील, अशी बैठक व्यवस्था करणे बंधनकारक आहे. योजनेच्या दोन तासांच्या व्यतिरिक्त वेळेत व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे.

शिवथाळी खानावळ सुरू करत असलेली जागा ही अतिक्रमित नसल्याचे पत्र सादर करणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने याबाबत निर्णय घेतले आहेत. गुरुवारी नगरमध्ये सुरू होणार्‍या शिवभोजन केंद्रांना भेटी देऊन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी स्वत: पाहणी करत सूचना देखील दिल्या आहेत.

या ठिकाणी मिळणार शिवभोजन
मार्केडयार्ड येथे हॉटेल आवळा पॅलेस (150 थाळी), सिव्हील हॉस्पिटल येथील कृष्णा भोजनालय (150 थाळी), तारकपूर बस स्थानकासमोरील हॉटेल सूवर्णम प्राईड संचालित अन्नछत्र (150 थाळी), रेल्वे स्टेशनसमोर दत्त हॉटेल (150 थाळी), हमाल पंचायत संचालित कष्टाची भाकर केंद्र (100 थाळी).

मर्यादित वेळेत थाळी असल्याने सुरुवातीला गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलीस संरक्षणाची गरज लागू शकते. ऑनलाईन माहिती भरण्यासाठी वेगळा माणूस नेमावा लागणार आहे. सरकारच्या सूचनेप्रमाणे काम चालू आहे. शासनाचे अधिकारी वेळोवेळी येऊन पहाणी करत आहेत. तयारी पूर्ण झाली आहे. शिवभोजन प्रजाकसत्ताक दिनापासून मिळणार आहे.
– साईनाथ घोरपडे
शिवथाळी संचालक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या