शिर्डी | शहर प्रतिनिधी
राज्यातील मविआ सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी उत्तर नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिर्डी शहरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
दरम्यान शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत शिवसेनेचे ३९ आमदार फोडून बंड केले आहे. शिंदे यांच्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या या भूमिकेमुळे शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून उत्तर नगरचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली आज (सोमवार) सकाळी साडेबारा वाजेच्या सुमारास खा. सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राजेंद्र झावरे, कमलाकर कोते, सुहास वहाडणे, जिल्हा संघटक विजय काळे, तालुकाप्रमुख संजय शिंदे, मा.उपनगराध्यक्ष विजय जगताप, धनंजय गाडेकर, अनिल बांगरे, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर, भारतीय कामगार सेनेचे ज्ञानेश्वर पवार, शिवसेना महिला आघाडीच्या सपना मोरे, महिला संघटक स्वाती परदेशी, लक्ष्मी आसणे आदीसह महिला पदाधिकारी तसेच उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगांव, श्रीरामपूर, नेवासा, राहुरी येथील सर्व पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी शिर्डी येथील शासकीय विश्राम गृहावरुन शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करत आपला मोर्चा नगर मनमाड महामार्गावरुन पायी थेट शिर्डी नगरपरीषदेसमोर आणत महामार्गावर ठिय्या मांडला. दरम्यान शिवसेनेच्या वतीने बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांचासह आणखी दोन असे एकूण तिन पुतळे जाळणार असल्याची पुर्वकल्पना पोलीसांना असल्याने त्यांनी अगोदरच पुतळे ताब्यात घेतले होते.
तरिदेखील काही शिवसैनिकांनी पोलीसांना चकमा देत तीन टायर जाळण्यासाठी आंदोलनस्थळी आणले असता यावेळी पोलीसांनी सतर्कता बाळगून सदरचे टायर त्या शिवसैनिकाच्या ताब्यातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु यादरम्यान पोलीस आणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ झटापट होऊन तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रसंगावधान राखून अखेर पोलीसांनी सदरचे तिनही टायर जप्त केले. यावेळी भाजपा आणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शिवसैनिकांनी प्रचंड घोषणा दिल्या.
या बंडखोर आमदारांनी आमची दिशाभूल केली आहे.आज जरी ते सोडून गेले तर ख-या अर्थाने मी त्यांचे आभारच मानतो, कारण ते गेले पण शिवसेना जागी करून गेले आहे.हि जागी झालेली शिवसेना सातत्याने अशीच राहिल आणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे राहुन एकसंघ लढेल.
रावसाहेब खेवरे (जिल्हाप्रमुख, शिवसेना)
जात, गोत्र, धर्म आमचा शिवसेना आहे त्यामुळे शिवसेनेत कोणी राहू, अगर न राहू आम्ही मात्र शेवटपर्यंत शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहाणार आहे.सध्याचे आलेले संकट फार काही मोठे नाहीये,येणाऱ्या काळात या संकटाचे निवारण होईल.हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे.थोडेफार मतभेद झाले असतील तरी देखील ते दूर सारुन गेलेले सर्व बंडखोर आमदार पुन्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतील.
कमलाकर कोते (शिवसेना नेते, शिर्डी)