Sunday, May 26, 2024
Homeनाशिकआ. कांदेंच्या बंडखोरीने शिवसैनिक संभ्रमात

आ. कांदेंच्या बंडखोरीने शिवसैनिक संभ्रमात

मनमाड । प्रतिनिधी Manmad

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे आघाडी सरकार ( Mahavikas Aaghadi )अडचणीत आले असून शिंदे यांच्यासोबत आमदार सुहास कांदे ( MLA Suhas Kande ) यांचाही देखील समावेश असल्याने मनमाड-नांदगाव शहरांसह तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

- Advertisement -

आ. कांदे स्वखुशीने गेले कि दबावाखाली; असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. दरम्यान, राज्यात सत्ता परिवर्तन होऊन ना. शिंदे यांच्या सहकार्याने नवीन सरकार सत्तेवर आल्यास आ. कांदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे दादा भुसे व सुहास कांदे हे 2 आमदार असून ना. भुसे मुंबईला आहेत तर आ. कांदे हे शिंदेंसोबत गेले आहेत. ना. शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये खळबळ उडून कट्टर शिवसैनिक असलेले शिंदे यांनी बंडखोरी का केली? असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. शिवाय शिंदे यांच्या गटात आ. कांदे देखील आहेत. आ. कांदे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खा.संजय राऊत व एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत.

विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर आ. कांदे यांनी मतदारसंघाचा विकास करण्याचा चंग बांधला. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला. मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी तब्बल 311 कोटींची करंजवण पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे.

मनमाड, नांदगाव या दोन्ही शहरासह मतदारसंघात रस्ते, पूल, नदी-नाले सफाई, लहान-मोठे बंधारे यासह इतर विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. या कामांसाठी नगरविकासमंत्री शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी देखील मदत केली असल्यामुळे आ. कांदे सरकारवर नाराज नव्हते.

मात्र अचानक घडलेल्या घडामोडीत आ. कांदे हे ना. शिंदे यांच्यासोबत का गेले? त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला का? असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या